मृत्यूच्या खाईतले देवदूत


आठशे फूट खोल दरीतील  निसरड्या कातळावर पंचवीसेक मृतदेहांच्या गराड्यात उभारलेला नीलेश जोरात ओरडला, ‘अरे एकजण जिवंत आहे रे  पोट हलतंय त्याचं.’ कोप-यातल्या एका मृतदेहाची नाडी तपासणारा जयवंत ताडकन् उठून वाट काढत नीलेशजवळ आला.  मृत्यूच्या खाईतही जिवंत श्वासाची झुळूक दोघांच्या मनाला उभारी देणारी ठरली. चार मृतदेहांच्या ढिगाखाली अडकलेल्या त्या जिवंत देहाला कसंबसं बाहेर काढून नीलेशनं वरच्या दिशेनं आरोळी ठोकली, ‘एकजण जिवंत सापडलाय. जाळी पाठवा पटकन्'

दरीच्या उभ्या कड्यावर प्रत्येक शंभर-दीडशे फुटांच्या अंतरावर उभारलेल्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज जोरात ओरडून एकमेकांना फॉरवर्ड करत वर पाठविला.  पाहता-पाहता वरच्या ‘रोप’वरून जाळीचं कापड खाली येऊ लागलं. हा कडा वेड्यावाकड्या दगडांनी तयार झालेला, त्यामुळं झोळी खाली यायला खूप वेळ लागला. शेवटी कशी-बशी ती जाळी जयवंतच्या हाती लागली, मात्र तेव्हा नीलेशचा चेहरा पडला होता. मलूल झाला होता.. कारण गेल्या तीन-चार तासांपासून तग धरून राहिलेला एक जीव मदत पोहचेपर्यंत काही क्षणही प्रतीक्षा करू शकला नव्हता हातात जाळी घेऊन दोघेही हतबलपणे त्याच्या निष्पाप चेहर्‍याकडं बघत होते..

मुक्काम पोस्ट : आंबेनळी घाट.

महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील अत्यंत अक्राळ-विक्राळ असं सह्याद्रीचं खोरं.  दुर्गम पर्वतरांगांच्या दरीत निपचित पडलेल्या तीस मृतदेहांच्या सान्निध्यात तब्बल चोवीस तास काढणारा नीलेश बावळेकर सांगत होता, ‘आंबेनळीच्या दरीत बस कोसळलीय. ताबडतोब मदतीला निघा,’ असा मेसेज दापोलीच्या एका मित्राकडून येताच आम्ही इथं पोहचलो. नेमकं काय झालंय, हे  कुणालाच काही माहीत नव्हतं. आम्ही दोर लावून खाली उतरत गेलो. आठशे फुटांवर आल्यानंतर आम्हाला जे दिसलं, ते अत्यंत भयानक होतं.  फक्त एकाची थोडी फार हालचाल होती, मात्र, आम्ही त्याला वर नेईपर्यंत संपलं सगळं.’

आजपावेतो जीवन-मृत्यूच्या खेळाचा शेकडो वेळा ‘आँखो देखा हाल’ पाहणारी नीलेश अन् जयवंत ही पोरं एरवी तशी चारचौघांसारखी. महाबळेश्वरमध्ये काम करून आपलं पोट भरणारी. मात्र, दऱ्याखोऱ्यातील अपघातग्रस्त जखमींसाठी जणू मावळे. प्रतापगड-जावळीच्या खोर्‍यातील झुंजार मावळे.  अन् सध्याच्या आधुनिक युगातले ‘ट्रेकर्स’. होय ट्रेकर्स. पण यांचं काम वेगळं. स्वत:च्या धाडसी छंदासाठी कमरेला ‘रोप’ लावून उंच सुळक्यांची शिखरं पादाक्रांत करणारी ‘ट्रेकर्स’ मंडळी वेगळी.. अन् अपघातातील जखमींसाठी खोल दरीत उतरणारी ही ‘ट्रेकर्स’ मंडळी वेगळी. ती वर चढतात. ही खाली उतरतात.

जीव धोक्यात घालण्याचा हा छंद समाजासाठीही जोपासू शकतो, याची जाणीव महाबळेश्वरला झाली 19 वर्षांपूर्वी. ‘सह्याद्री ट्रेकर्स’चे संस्थापक संजय पार्टे बोलताना जुन्या आठवणीत रमून गेले होते, ‘आमचा आयुष्यात कधीच ट्रेकिंगशी संबंधच आला नव्हता. मला फक्त कराटेची आवड होती. 1999मध्ये केट्स पॉइंटवर ध्यानधारणेला बसलेल्या एका अमेरिकन तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. दरीची खोली तब्बल चार हजार फूट. साधं खाली वाकून बघितलं तरी माणसाला चक्कर यायची. त्यावेळी पॉइंटवर सर्वांची गर्दी जमली म्हणून मी ही तिथं उत्सुकतेनं गेलेलो.’

तेव्हाचे पोलीस अधिकारी सचिन अहंकारे यांनी मला पाहताच जाहीर केलं की, काही स्थानिकांना घेऊन मी तिरक्या दिशेनं खाली जायचं. कारण का? तर कराटेपटू म्हणे धाडसी असतात. काटक असतात. ही कल्पना ऐकताच मी क्षणभर दचकलो. गांगरलो. मात्र एक्साईटही झालो. काही लोकांना घेऊन तब्बल तीन डोंगरांना वळसे घालत-घालत खाली स्पॉटवर पोहोचलो. चार दिवस उलटल्यानं मृतदेहाची फारच दुर्दशा झाली होती. तरीही गोणीत भरून बॉडी आम्ही कशीतरी वर आणली; पण त्यानंतर चार दिवस मी काही खाल्लंप्यालं नाही. सारखं तेच नकोसं दृश्य डोळ्यासमोर दिसे आणि तोच वास! मात्र, पुण्याईचं काम केलं म्हणून मनातून बरंही वाटायचं.’ -पार्टेंची आठवण ताजी!

त्याकाळी दरीत पडलेल्या मृतदेहाचा पंचनामा वरूनच कागदोपत्री केला जायचा. खूपच गरज भासली तर जंगलात मध अन् वनौषधी गोळा करणा-या आदिवासी लोकांना खाली पाठवून जागीच अंत्यसंस्कार केले जायचे. मात्र, केट्स पॉइंटच्या घटनेनंतर पार्टे यांनी अनेक अपघातांत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. अनेक मृतदेह दरीतून वर आणले. हळूहळू त्यांची कराटे चॅम्पियन पोरंही या मोहिमेत सामील होऊ लागली. यातूनच मग निर्मिती झाली ‘सह्याद्री ट्रेकर्स’ संस्थेची. आजपर्यंत या संस्थेनं सुमारे 281 मृतदेह बाहेर काढले आहेत.आणि आजवर 16 जखमींना वाचवलं आहे. विशाळगड अन् राधानगरी घाटातील अपघातग्रस्तांसाठीही त्यांनी कामगिरी बजाविली. मांढरदेवी यात्रेच्या चेंगराचेंगरीतील 35 मृतदेह उचलणार्‍या पार्टे टीमसाठी सर्वात जास्त आठवणीत राहिलेला अपघात म्हणजे वाईच्या पसरणी घाटातला. गुजरातची बस दरीत कोसळून तब्बल 56 प्रवासी जागीच ठार झाले होते. त्यावेळी हे सारे मृतदेह गोळा करून बाहेर काढताना या सार्‍या ट्रेकर्सची मुर्दाड बनलेली मनं अनेक दिवस त्याच अवस्थेत होती. सावित्री नदीवरील महाड पुलाच्या दुर्घटनेतही या मंडळींनी कष्ट घेतले.

पार्टेंचा व्यवसाय झेरॉक्सचा. त्यांचे सहकारीही असलीच छोटी-मोठी कामं करणारे. बहुतेक जणांचं पोट हातावरचं. एखादा दिवस गॅप पडला तरी अँडजेस्टमेंट करावी लागेल अशी कामं. मात्र, ‘रेस्क्यू’ मोहिमेच्या वेळी दोन-दोन दिवस दुकान बंद ठेवून ही पोरं दर्‍या-खोर्‍यात भटकत फिरतात, तेव्हा स्वत:च्या पोटापाण्याची भ्रांत विसरून जातात. विजय केळगणे, अक्षय शेलार, संजय भोसले, वैभव जानकर अन् अक्षय कांबळेसारखी असंख्य पोरं जणू केवळ याच मोहिमेसाठी जन्माला आलेली.

‘ट्रेकर्स’ मंडळींची संख्या वाढू लागली, तशी अजून एक संस्था इथं तयार झाली. नाव : ‘महाबळेश्वर ट्रेकर्स.’ अनिल केळगणे, सुनील भाटिया, राहुल तपासे, नीलेश बावळेकर, जयवंत बिरामणे अन् सनी बावळेकरसह असंख्य ‘ट्रेकर्स’नी तर ‘रेस्क्यू’ मोहिमेत तोंडात बोटं घालण्याइतपत अचाट कामगिरी केली आहे. या मंडळींनी आजपावेतो 150 पेक्षाही जास्त मृतदेह शोधून नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहेत. जवळपास 40 अपघातग्रस्तांना वाचवलं आहे. कधी कधी ‘खाकी’चा विरोधही पत्करून ‘ट्रेकर्स’नी अनेकांचे जीव वाचवले आहेत.

ही विचित्र घटना तीन वर्षांपूर्वीची. बंगलोरच्या एका उद्योजकाला त्याच्या नातेवाइकाच्या मोबाइलवरून मेसेज आला की, ‘महाबळेश्वरच्या दरीत आम्ही दोन दिवसांपासून अडकून पडलोय. आम्हाला वाचवा,’ परंतु तो नंबर नंतर सतत ‘आउट ऑफ कव्हरेज.’ तेव्हा त्या उद्योजकानं हा मेसेज कर्नाटकातल्या एका ‘ट्रेकर्स’ला पाठविला. त्यानं महाराष्ट्रातल्या ‘ट्रेकर्स’च्या ग्रुपवर टाकला. मग काय. सुनील भाटिया यांची टीम कामाला लागली. पहिला प्रश्न होता, नेमक्या कोणत्या दरीत शोध घ्यायचा? महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी, केळघर, भोर, आंबेनळी अन् तापोळ्यासह असंख्य किचकट घाट. तरीही या वेड्या वीरांनी दिवसभर तीन-चार घाट पालथे घातले. दर एक किलोमीटरला गाडी थांबवून खालच्या दरीत हाक मारायची. काहीच रिप्लाय आला नाही की पुढचं वळण गाठायचं. असं करत करत ते महाडला पोहचले.

एवढय़ात ‘त्या’ अपघातग्रस्त मोबाइलचं नेटवर्क दोन दिवसांपूर्वी महाडच्या टॉवरशी जोडलं गेलं होतं, हे यांना कळलं. त्यांनी महाडच्या पोलिसांना तसं सांगितलं. मात्र ‘आमच्याकडे अशा कुठल्याही अपघाताची नोंद नाही,’ असं तिथल्या एका कर्मचा-यानं सांगून त्यानं घरी जाण्याचा सल्ला दिला. टीम गुपचूप आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडं येऊ लागली. त्यांनी थांबत थांबत हाका मारण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीचा दीड वाजलेला. घाटाच्या मध्यावर आल्यानंतर एका वळणावर त्यांनी फूल टॉर्च दरीत मारला, तेव्हा एक क्षीण असा बायकी आवाज खालून आल्याचा भास एकाला झाला. तो ओरडला, ‘आला. आवाज आला. खाली कुणीतरी आहे जिवंत,’ मग काय? - टीम पटापट कामाला लागली. गाडीतला ‘रोप’ खाली सोडला गेला. टप्प्याटप्प्यानं एकेक जण खाली उतरत गेला. सातशे फूट खाली गेल्यानंतर हेड टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात एक छोटीशी मुलगी हात वर करून खालच्या दगडावर उभी राहिलेली दिसली. दाट जंगलात रक्तबंबाळ मुलीचे निस्तेज डोळे प्रकाशात चमकले, तेव्हा शेवटच्या ‘ट्रेकर्स’च्या अंगावर भीतीचे शहारे उमटले. जोरजोरानं आवाज करत तो खाली उतरला. तिथं एक पुरुष खालच्या खड्डय़ातून वरच्या दगडावर त्या मुलीला उभं करत होता, जेणेकरून त्यांचं अस्तित्व या ‘ट्रेकर्स’ मंडळींना जाणवावं.

खालच्या टप्प्यात पालथी पडलेली चक्काकूर कार होती. बाजूला चार माणसं पडली होती. एक पुरुष दोन्ही पाय पूर्णपणे उलटं झालेल्या अवस्थेत विव्हळत होता. समोर एका मृतदेहावर एक स्त्री चक्क बसलेली. शेजारी बहुधा तिच्या आईचा मृतदेह! हे भयानक दृश्य पाहून एखाद्याला जागीच हार्टफेल झाला असता. मात्र दुसर्‍यांच्या प्राणासाठी स्वत:च्या जिवावर उदार होणारी ही पोरं धाडसीच. या कुटुंबाला केवळ कन्नडच येत असल्यानं ते नेमके काय म्हणतात, हे मराठी ‘ट्रेकर्स’ना कळत नव्हतं.  स्वत:च्या कमरेचा दोर वरच्या झाडाला बांधून या मुलांनी तिला अन् तिच्या जिवंत नवर्‍याला वर खेचलं. नंतर नऊ वर्षांच्या इवल्याशा पोरीला सर्वप्रथम वर पाठविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कुटुंबासोबतचा एक नोकर ‘पैले मेरे को उपर भेजो.’ म्हणून ओरडू लागला. अशा परिस्थितीतही माणसातल्या स्वार्थीपणाची पोरांना चीड आली, तरीही त्याच्या ओरडण्याकडं दुर्लक्ष करत त्यांनी हळूहळू एकेकाला वर नेलं. एक टीम त्यांच्यासोबत पोलादपूर रुग्णालयात पाठवून दुसरी टीम पुन्हा खोल दरीत उतरली. पहाटे साडेचार वाजता. दोन मृतदेह वर काढण्यासाठी. ऐन हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीतही या मुलांमधली माणुसकीची ऊब श्रेष्ठ ठरली होती.

सुनील भाटिया सांगत होते, ‘दोन दिवसांनंतर कर्नाटकातून या कुटुंबाचे नातेवाईक आले. पोलिसांकरवी आम्हाला सांगून त्यांनी दरीतलं त्यांचं बाकीचं सामानही काढून घेतलं. तेही काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. मात्र जाताना त्यांनी आम्हाला साधं थँक्यूसुद्धा म्हटलं नाही. खूप वाईट वाटलं. तरीही वाटलं, जाऊ दे. जगाच्या दृष्टीनं आम्ही सरकारी ड्यूटी बजावतोय; पण त्यांना कुठं माहितंय की आम्ही आमचा कामधंदा सोडून, खिशातले पैसे घालून अन् जीव धोक्यात टाकून मृत्यूशी संघर्ष करतोय.’ अनेकांचं आयुष्य वाचविणार्‍या अन् अनेकांच्या मृतदेहांचे भोग थांबविणा-या या ‘ट्रेकर्स’ मंडळीचा हा विषाद काळजाला हात घालणारा होता. पण एक ना एक दिवस ही मंडळी ‘मृत्यूच्या खाईतले देवदूत’ म्हणूून ओळखली जाणार, हे मात्र शंभर टक्के नक्की !

लेखक- सचिन जवळकोटे सह्याद्री ट्रेकर्स इमेल:-  [email protected]  महाबळेश्वर ट्रेकर्स इमेल :- [email protected]


सोशल मिडीया , सचिन जवळकोटे , सह्याद्री ट्रेकर्स

प्रतिक्रिया

  1. Shubhangi Kadganche

      4 वर्षांपूर्वी

    शत नमन या निःस्वार्थ वीरांना 🙏

  2. jyoti patwardhan

      4 वर्षांपूर्वी

    हा लेख वाचल्यावर अशी धाडसी आणि समाजोपयोगी कामं करणाऱ्यां बद्दल कळलं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा

  3. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    या कार्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. या वेड्या वीरांना आमचा कडक सलाम.

  4. Rdesai

      6 वर्षांपूर्वी

    अशी माणुसकी आज दुर्मिळ झाली आहे .टीमला सलाम!

  5. sunilkumarm

      7 वर्षांपूर्वी

    देवदुतांना साष्टांग दंडवत !

  6. Bilwadal

      7 वर्षांपूर्वी

    ट्रेकर्स चे कौतुक व अभिमान. शुभेच्छा व आशिर्वाद... त्यांची मेहनत व लगन ला सलाम... त्यांची पुण्याई सदैव पाठीशी राहो ही सदिच्छा. लेखाबद्दल आभार

  7. Deepak Powle

      7 वर्षांपूर्वी

    With due respect I salute them.Its worth a job.God bless them and give them the strength for the good work they are doing. We should all pray for their safety.

  8. nasa1945

      7 वर्षांपूर्वी

    लेख उत्तम. ट्रेकर्सच्या नि:स्वार्थी कामाचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच हे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं काम पुनश्चमुळे होत आहे म्हणून तुमचही अभिनंदन.

  9. Monika

      7 वर्षांपूर्वी

    ट्रेकर्स च्या निस्वार्थी कार्या बद्दल त्यांना शतशा नमन. लोकांचे जीव वाचवण्या सारखे दूसरे अनमोल कार्य नाही.

  10. kaustubhtamhankar

      7 वर्षांपूर्वी

    शंभर सलाम

  11. Rahul Wagh

      7 वर्षांपूर्वी

    मृत्यूच्या खाईतले देवदूत ------- real heros..hats off to them

  12. suhas33m

      7 वर्षांपूर्वी

    स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या ह्या साहसी युवकांना माझा सलाम

  13. अड.गीता देशपांडे

      7 वर्षांपूर्वी

    थँक्यू हा लेख लिहूूू न तुम्ही शेअर केलात त्याबद्दल.वाचताना अंगावर शहारे आणि डोळ्यांना धारा लागल्या होत्या.जीव वाचवण्यासाठी तुम्ही डाॅक्टरां इतकीच धडपड करता.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालता.खाणं ,पिणं ,पैसा, कुटूंब,कशाचंही भान न ठेवता ध्येय फक्त एकच. पण डाॅक्टरा इतका मान तुम्हाला मिळत नाही.मान तर जाऊद्या.लोकं साधं थँक्यू ही म्हणत नाही.थिजलेल्या मनांची लाज वाटते

  14. किरण जोशी

      7 वर्षांपूर्वी

    वास्तव परिस्थितीशी दोन हात करून माणुसकीला वाचवण्याचे महान कार्य करणार्या या बाजींना सलाम!!!!

  15. jayashree.galgali

      7 वर्षांपूर्वी

    खरेच देवदूतसर्वाना खूप खूप शुभेच्छा.

  16. SUBODHINI

      7 वर्षांपूर्वी

    अशा वीरांना मनःपूर्वक साष्टांग नमस्कार

  17. [email protected]

      7 वर्षांपूर्वी

    देवदूतचं हाय लगा,सलाम !

  18. nstekale

      7 वर्षांपूर्वी

    These are real heros..hats off to them.Article is excellent but equally painful to read it.Banglore incidence is tearful.Just find out the root cause of accidents in Ghat sections.Every time we can not blame to drivers,it's a destruction of hilltops,loss of top soil and green vegetation makes the road slippery in rainy season...youth should take initiatives to protect our hilltops by doing tree plantation near the base in three tier manner.Congratulations Trekkers for taking efforts to save the precious lives...

  19. FerozBpathan

      7 वर्षांपूर्वी

    या सर्व ट्रेकर्स चे अभिनंदन लोक धन्यवाद देत जरी नसले तरी परमेश्वराकडे पुण्याई नक्कीच साचणार आहे तुम्हा लोकांची

  20. shri2005

      7 वर्षांपूर्वी

    खूप अभिनंदन करायलाच हवे या ग्रुपचे.

  21. Manjiri

      7 वर्षांपूर्वी

    Pranaam team la. Chaan lekh

  22. ATULGODBOLE

      7 वर्षांपूर्वी

    ग्रेट ! आजकाल असे लोक दुर्लभच

  23. प्रबोध ढवळे

      7 वर्षांपूर्वी

    माणूसकीची काम करतांना, असे अनुभव आले तरी त्यानी खचून न जाता आपल काम करत राहिले पाहिजे. हो!मान्य की हे बोलणं सोप आहे! करणाऱ्याला समजत काय वेदना होतात ते! म्हणुनच म्हणतोय! त्या सगळ्यांना शत:षा वंदन!

  24. maheshbapat63

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय कौतुकास्पद कामगिरी।या लेखामुले असेही निस्वार्थ काम करणारे साहसी युवक समाजात आहेत हे कलले।

  25. rajashreejoshi

      7 वर्षांपूर्वी

    वाचताना अंगावर काटाच आला. या कामाची कशा बरोबर पण तुलना नाही होऊ शकत. शतशः प्रणाम या टीम ला

  26. BGS

      7 वर्षांपूर्वी

    Great ??



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen