बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध-अशुद्धता (भाग- २)


"व्याकरणाचे साधे नियमही बोलीभाषांची ढाल पुढे करून अमान्य केले जातात. त्यावर ‘कशाला हवंय व्याकरण वगैरे?’ असाही एक प्रश्न येतो. व्याकरण हे फक्त मराठी भाषेचंच असतं असं नाही, ते प्रत्येक क्षेत्रात असतं. ‘मला वाट्टेल तसं गाणं मी म्हणेन’ किंवा ‘मला वाट्टेल तसा अभिनय मी करेन’, असं आपण कधी म्हणतो का? एखाद्या क्षेत्रात काम करताना संबंधित गोष्टीचे नियम आपण शिकतोच ना! मग भाषेच्या बाबतीत आपल्याला नको तेवढं स्वातंत्र्य का हवं असतं? कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते हे खरंच खरं असेल तर, आलाराम (alarm), टॉक्डं (talked) आणि वॉक्डं (walked) हे उच्चारही आपण स्वीकारायला हवेत." भाषा-शुद्धतेसंदर्भात अशा विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या लेखमालिकेतील पत्रकार नमिता धुरी यांचा हा दुसरा लेख. सदर लेख सर्वांसाठी खुला आहे. 

--------------------------------------------

भाषाशुद्धीची दहशत

काही कुटुंबांमध्ये अक्षरांचे चुकीचे उच्चार हे पिढ्यान् पिढ्या चालत आलेले असतात. त्याला कारण हे असते की, ते कुटुंब ज्या समाजातून आलेले असते त्यांना मुळातच शिक्षणाचा अधिकार खूप उशिरा मिळालेला असतो. त्यामुळे कुटुंबातून होणाऱ्या अनौपचारिक भाषासंस्कारांतून गरजेपुरता भाषाविकास झालेला असतो. औपचारिक भाषाशिक्षण  त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नसते. अशा समाजाला आपल्या भाषेबाबत शिक्षित आणि जागृत करणे ही त्याच समाजातल्या सुशिक्षितांची जबाबदारी असते. पण हे सुशिक्षित स्वत:च आपल्या भाषेबाबत जागरूक नसतात. त्यामुळे चुकीचेच उच्चार पुढे नेले जातात.

जातव्यवस्थेत शिखरावर असणाऱ्या समाजाला शिक्षणाचा अधिकार सर्वांत आधी प्राप्त झाल्याने त्यांच्यात वाचनसंस्कृती रुजली आणि भाषाविकास इतरांच्या तुलनेत लवकर सुरू झाला. अशा समाजातील व्यक्ती जेव्हा शुद्ध उच्चार शिकवू पाहते तेव्हा त्यांच्या समाजाने इतरांवर केलेला अन्याय आठवून भाषाशुद्धीकडे जातीय दृष्टिकोनातून पाहिले जाण्याची शक्यता असते. अशुद्ध भाषा किंवा भाषाशुद्धी या शब्दांची प्रचंड दहशत आपल्या मनात असते. माझ्या उच्चारांना कोणी व्यक्ती अशुद्ध म्हणते म्हणजे ती मला किंवा माझ्या समाजाला कमी लेखू पाहते या न्यूनगंडातून आपण बाहेर पडले पाहिजे.

हेही वाचलंत का?

बोलीभाषांची ढाल आणि भाषेची शुद्ध – अशुद्धता (भाग – एक)

भाषाविचार – इंग्रजीचं जग आणि व्हर्नाक्युलर लोकांची प्रतिष्ठा (भाग – ४)

थोडंसं विषयांतर करून आणखी काही उदाहरणं इथे द्यावीशी वाटतात. आपण शब्दांना खूप घाबरतो. ‘मतिमंद’ म्हटलं की ते अपमानास्पद वाटतं. मति म्हणजे बुद्धी आणि मंद म्हणजे वेग कमी असणे. ज्याची मति इतरांच्या तुलनेत मंदगतीने विकसित होते तो मतिमंद, इतका साधा अर्थ आहे. शिवाय मतिमंदपणा ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. अपमान वाटण्यासारखं त्यात काहीच नाही. तरीही विनाकारण मतिमंद शब्दाची भीती बाळगली जाते. ‘अपंग’ शब्दाचीही अशीच भीती बाळगून त्याऐवजी ‘दिव्यांग’ या हिंदी शब्दाचा वापर केला जातो. ज्याला अपमानच करायचा असेल तो ‘विशेष मूल’ असा उल्लेख करूनही मतिमंद मुलांचा अपमान करू शकतो. त्यामुळे इथे मतिमंद शब्द योग्यच आहे. फक्त दृष्टिकोन चांगला किंवा वाईट असू शकेल. भीक मागणाऱ्याचा उल्लेख ‘भिकारी’ असा केला की काही अति चांगल्या लोकांना राग येतो. त्यांचं म्हणणं असतं की, तो गरीब आहे. कष्ट करून पैसे कमावणारे गरीब आणि भीक मागणारा भिकारी यांना एकाच पारड्यात तोलण्याची काय गरज?

अशाच प्रकारच्या गैरसमजातून ‘भाषाशुद्धी’ या शब्दाबद्दल आपल्या मनात भीती निर्माण झाली आहे. सामाजिक रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून काही भाषाप्रेमी “शुद्ध किंवा अशुद्ध भाषा असे काही नसते. सर्व भाषा शुद्धच असतात”, अशी भूमिका घेतात. भाषाविषयक अज्ञानातून आलेल्या चुकीच्या उच्चारांचे बोलीभाषेच्या नावाखाली उदात्तीकरण करण्यापेक्षा त्या समाजाला भाषेबाबत शिक्षित केले गेले पाहिजे. प्रत्येकाच्या कुटुंबातून मिळालेले भाषासंस्कार चांगलेच असतात आणि ते पुरेसे असतात, पुढे त्यात सुधारणा करण्याची काहीच गरज नसते, अशी आपली धारणा असेल तर शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा विषयाचा स्वतंत्रपणे समावेश करण्याला आपण विरोध केला पाहिजे. कारण, या विषयाचा उद्देशच मुळात भाषेबाबतचे अधिकचे ज्ञान देणे म्हणजेच भाषाविकास करणे हा असतो. अशावेळी 'न' आणि 'ण' या दोन स्वतंत्र चिन्हांचा स्वतंत्र उच्चार करायला शिकवले जाण्याचा ‘धोका’ संभवतो. शिवाय इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने मराठी बोलत असतील तर ती त्यांची बोलीभाषा म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. कारण तशा प्रकारचे भाषासंस्कारही त्यांना त्यांच्या कुटुंबानेच दिलेले असतात.

‘आम्ही ब्राह्मणांची भाषा का बोलावी?’ असा काहींचा प्रश्न असतो. भाषा ही विशिष्ट एका जातीची मक्तेदारी कशी असू शकते? भाषेचे नियम सर्वांसाठी सारखे असतात. ब्राह्मणांची भाषा म्हणून प्रमाणभाषेचा द्वेष करणारे मराठी भाषक स्वत:हूनच सर्व क्षेत्रांत जाण्यासाठीचे स्वत:चे मार्ग बंद करून टाकतात. आपली हक्काची गोष्ट एखाद्या जातीला बहाल करून टाकण्यापेक्षा आपले त्यावरील प्रभुत्व सिद्ध करून प्रगती करणे आपण का टाळतो? मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांसाठी वृत्तनिवेदन, नाटक, इत्यादी क्षेत्रांत जाण्याचे मार्ग खुले होतात.

इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, भाषाज्ञान आणि समाज (जात) यांबाबतची समीकरणे अलीकडच्या काळात बदललेली दिसतात. पिढ्यान् पिढ्या शिक्षणाची परंपरा लाभलेल्या समाजातही अशुद्ध उच्चार ऐकायला मिळतात. याचे कारण, इंग्रजीकरणाच्या प्रक्रियेमुळे मराठीबाबत आलेली उदासीनता. ‘इंग्रजी म्हणजेच सर्व काही’, या मानसिकतेमुळे या वर्गाने मराठीची गरज कौटुंबिक संवादात भावना पोहोचवण्यापुरतीच मर्यादीत ठेवली. त्यामुळे या वर्गाने पिढ्यान् पिढ्यांचे मराठीचे संस्कार कचराकुंडीत फेकले. याउलट, वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षणाची संधी मिळताच त्यांतील काहीजण मराठी भाषेवर आपले प्रभुत्व सिद्ध करतात. कोणत्याही परक्या भाषेच्या क्षेत्रात काम करतानाही ते मराठीबाबत जागरूक असलेले दिसतील.

बऱ्याचदा वेगात बोलताना आपण काही स्वरचिन्हे गिळतो, तर काही ठिकाणी ती निर्माण करतो. बोलण्याच्या ओघात झालेल्या चुका लक्षात आल्या तरी त्या सुधारण्याचा आळस करतो. मग पुढच्या पिढीवरही त्याच उच्चारांचे संस्कार होतात. एक साधं उदाहरण – ‘खूप लोक जमले होते’ असं म्हणण्याऐवजी काहीजण ‘खूप लोकं जमली होती’ असं म्हणतात. ‘लोक’ हा शब्द आधीच समूहवाचक म्हणजेच अनेकवचनी आहे. त्याचा ‘लोकं’ असा उच्चार करून पुन्हा अनेकवचनी करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी मात्रा येतो त्या ठिकाणीच अनुस्वार येतो. उदा. पाहिले = पाहिलं, आणले = आणलं, वर्षे = वर्षं. काही शब्दांचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच असतं. उदा. ‘केस’ या शब्दाचं ‘केसं’ हे अनेकवचन होत नाही. बऱ्याचदा मुली ‘मी आली, मी गेली’, असे म्हणतात. मुलं मात्र, ‘मी आलो आणि तो आला’ असे म्हणतात. जर मुलांसाठी ‘आलो’ आणि ‘आला’ अशी दोन वेगवेगळी क्रियापदं असू शकतील तर मुलींसाठी एकच क्रियापद का असेल, इतका साधा विचारही मुलींना करावासा वाटत नाही. स्वत:बद्दल बोलताना ‘मी आले, मी गेले’ म्हणावं. दुसऱ्या मुलीबद्दल बोलताना ‘ती आली, ती गेली’ म्हणावं. पण हे व्याकरणाचे साधे नियमही बोलीभाषांची ढाल पुढे करून अमान्य केले जातात. त्यावर ‘कशाला हवंय व्याकरण वगैरे?’ असाही एक प्रश्न येतो. व्याकरण हे फक्त मराठी भाषेचंच असतं असं नाही, ते प्रत्येक क्षेत्रात असतं. ‘मला वाट्टेल तसं गाणं मी म्हणेन’ किंवा ‘मला वाट्टेल तसा अभिनय मी करेन’, असं आपण कधी म्हणतो का? एखाद्या क्षेत्रात काम करताना संबंधित गोष्टीचे नियम आपण शिकतोच ना! मग भाषेच्या बाबतीत आपल्याला नको तेवढं स्वातंत्र्य का हवं असतं? कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते हे खरंच खरं असेल तर, आलाराम (alarm), टॉक्डं (talked) आणि वॉक्डं (walked) हे उच्चारही आपण स्वीकारायला हवेत.

भाषेवरील प्रेम जितकं भावनिक तितकंच व्यावहारिक असायला हवं. तुमचं ज्या भाषेवर प्रेम आहे मग ती प्रमाण असो अथवा बोली, ती भाषा टिकवणं गरजेचं आहे. भाषा टिकवायची असेल तर तिचा प्रचार, प्रसार व्हायला हवा. त्यासाठी ती भाषा परभाषकांना शिकवली पाहिजे. ‘मी बोलतो, माझ्यामागून तू बोल…’ असं म्हणून कोणीही भाषा शिकत नाही. परभाषकांना भाषा शिकवायची तर ती व्याकरणशुद्धच शिकवावी लागेल आणि त्यासाठी मुळात आपल्यालाच व्याकरण पाळता आलं पाहिजे.

भाषेविषयीच्या उदासीनतेतून आलेल्या चुकीच्या भाषासंस्कारांवर हळूहळू बोलीभाषेची पाटी चिकटवली जाते. कारण, भाषा सुधारायची म्हणजे मोठमोठे शब्दकोश, व्याकरणाची पुस्तकं घेऊन बसावे लागेल असं एक चुकीचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. स्पष्ट उच्चारांच्या आग्रहाकडे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहाण्याची सवय आपण सोडली नाही तर मराठीला आपली उच्चारश्रीमंती गमवावी लागेल.

हे झाले उच्चारांचे….पण बोलीभाषेतील शब्दांचे काय?

बोलीभाषेतील जे शब्द प्रमाणभाषेतील शब्दांना समानार्थी असतील ते औपचारिक संभाषणातही स्वीकारले गेले पाहिजेत. उदा. फार-लय, लादी-फरशी, ढकलणे-लोटणे, वस्तू पुसण्याचे कापड किंवा कपडा यासाठी ‘फडकं’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. असे शब्द स्वीकारल्याने काहीही गमावण्याची भीती नसते, उलट प्रमाणभाषेत भर पडत राहील.

शालेय अभ्यासक्रमात मराठी विषयाच्या पुस्तकात बोलीभाषेतील धड्यांशी संबंधित उत्तरे बोलीभाषांमध्येच लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. उदा. – अहिराणी भाषेतील धडा शिकवताना अहिराणीत चर्चा करावी. परीक्षेतील प्रश्न अहिराणीतच विचारावेत. उत्तरे अहिराणीतच लिहावीत. काही भाषांमध्ये होय की, नाय की, करून राहिलो, बोलून राहिलो म्हणण्याची पद्धत असते. या पद्धती उत्तरं लिहिताना वापराव्यात. इतर विषयांसाठी आणि मराठीच्या इतर धड्यांसाठी मात्र प्रमाणभाषाच वापरली जावी. त्यामुळे दोन्ही भाषांचा समतोल राखला जाईल.

(क्रमशः)
– नमिता धुरी
(लेखिका पत्रकार आहेत.) 
संपर्क – ९८१९७४२०९५ [email protected]    

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी अभ्यास केंद्र , नमिता धुरी , बोलीभाषा , प्रमाणभाषा , भाषेची शुद्ध-अशुद्धता

प्रतिक्रिया

 1. साधना गोरे

    12 महिन्यांपूर्वी

  छान लेख आहे.

 2. नमिता धुरी

    2 वर्षांपूर्वी

  सर, इथे ‘आले’ आणि ‘हंबरले’ या दोन शब्दांचा एकमेकांशी काही संबंध आहे, असं मला वाटत नाही. पण ‘आले’ या शब्दाबाबतच सांगायचं झालं तर, शब्द सारखाच असला तरीही त्याचं लिंग, वचन आणि तो वापरण्यामागची भावना बदलू शकते. ‘आज बाबा लवकर घरी आले’, या वाक्यातील ‘आले’ शब्द आदरार्थी, पुल्लिंगी, एकवचनी आहे. ‘आमच्या घरी पाहुणे आले’, या वाक्यातील ‘आले’ शब्द अनेकवचनी आहे; तसेच पाहुणे पुरूष आहेत की स्त्री आहेत याचं स्पष्टीकरण वाक्यात नसल्याने ‘ते’ असं नपुसकलिंगी सर्वनाम गृहीत धरून ‘आले’ शब्द वापरला आहे, असंही म्हणता येईल. ‘मी आली’ आणि ‘ती आली’ या दोन्ही वाक्यांबाबत सांगायचं तर, इथेही एकच शब्द भिन्न अर्थाने दोन वाक्यांत वापरला आहे, असं म्हणता येईल. पण यामुळे मराठी भाषेला एक क्रियापद गमावावं लागेल. मराठीत मुलग्यांसाठी ‘मी आलो’ आणि ‘तो आला’ अशी दोन क्रियापदं आहेत, तशीच मुलींसाठीसुद्धा ‘मी आले’ आणि ‘ती आली’ अशी दोन क्रियापदं आहेत. ती आपण जपली पाहिजेत. इथे 'आले' हा शब्द एकवचनी स्त्रीलिंगी ठरतो. – नमिता धुरी

 3. नमिता धुरी

    2 वर्षांपूर्वी

  माझ्या ‘मराठी शाळा नेमक्या इथेच चुकतात’ या लेखात मी एक वाक्य वापरलं आहे. ‘बोलणे आणि म्हणणे यातला फरक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनीच संपवला’. बोलणे आणि म्हणणे या शब्दांमध्ये सूक्ष्म फरक आहे. तो समजून घेण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करते, इतरांनीही प्रयत्नपूर्वक योग्य शब्द वापरावा, अशी अपेक्षा आहे. आपण भाषा बोलतो… म्हणत नाही. पण आई लहान बाळाला सांगते, ‘बाबू आई बोल, आई बोल’. इथे ‘आई म्हण’ असं अपेक्षित आहे. इथे ‘जेते’ म्हणजे नेमके कोण ते कळेल का ? त्यांना आपण जेते का ठरवलं हे कळेल का ? ‘जेत्यांची भाषा शुद्ध ठरते’, या गैरसमजातून आधी आपणच बाहेर पडलं पाहिजे. सुरूवातीचे दोन परिच्छेद पुन्हा वाचावेत, ही विनंती. बाकी, ‘ज्यंतू’ हा शब्द कशासाठी लिहिला आहे ते कळलं नाही.

 4.   2 वर्षांपूर्वी

  धन्यवाद !

 5.   2 वर्षांपूर्वी

  धन्यवाद !

 6.   2 वर्षांपूर्वी

  मी आले नपुंसक लिंग वाटते. उदा वासरू हंबरले.

 7. रत्नाकर मार्कंडेयवार

    2 वर्षांपूर्वी

  ज्यंतू , आम्ही अमुक बोलतो (म्हणतो नाही) ही प्रमाण भाषा व्याकरणशुध्द आहे का ? जेत्यांची भाषा शुद्ध ठरते.

 8. शंकर भाटे

    2 वर्षांपूर्वी

  खूप छान.. समतोल विचार मांडले आहेत.

 9. अभय भंडारी.

    2 वर्षांपूर्वी

  खूप छान लेख. या मार्गदर्शनामुळे भाषाशुद्धी बद्दलचे बरेचसे पूर्वग्रह नाहीसे होतील असे वाटते..

 10. Varsha Satish Dandawate

    2 वर्षांपूर्वी

  सांगली जिल्ह्यामध्ये मुलीही मी आलो मी गेलो असे बोलतात कर्नाटक सीमेलगत सांगली जिल्हा येतो म्हणून की काय व्याकरण बदललेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen