गंमतशाळा - (भाग २)


मुलांनी अहिंसा, अन्याय यांसरखे शब्द ऐकलेले तर असतात; पण त्यामागील अर्थ त्यांना कळलेला असेलच असं नाही. मुलांचे शब्दांमागील, त्यांच्या भाषेमागील भावविश्व समजावून सांगतायत अनुराधा मोहनी -

त्या दिवशी एकूण आठ मुले साडेसात वाजता घरी आली. साऱ्यांना बसवले. आधी परिचय करायला सांगितला. परिचय म्हणजे पूर्ण नाव, आईचे नाव, शाळा, वर्ग, गावात कुठे राहतो ते आणि मुख्य म्हणजे घरी कोणकोण आहे ते. ह्यातून त्यांची कौटुंबिक स्थिती समजून घ्यायची होती. आठातल्या तीन मुलांनी सांगितले, की त्यांच्या घरी ते, त्यांचे एखाददुसरे भावंड, आई आणि आजी-आजोबा राहतात. आजी-आजोबा कोणते, तर आईचे आईवडील. अच्छा, म्हणजे गावातील माघारी आलेल्या मुलींची अपत्ये होती तर! त्यांचे प्रमाण येथे खूप जास्त आहे.
“ह्यांच्या घरी ‘फॅमिली प्रॉब्लेम’ आहे,” त्यांच्यातील एका मोठ्या मुलाने उत्तर दिले. हा मुलगा अमरावतीला वकिली शिकतो. त्याचे वडील वर्ध्यात वकिली करतात. आई नागपूरच्या एका शाळेत शिक्षिका आहे.
“इथे काहीतरी चांगलं चाललंय असं वाटलं म्हणून ह्या माझ्या भावाबरोबर पाहायला आलो. हे खूपच मोठं काम आहे. खरं तर हे ग्रामपंचायतीने अंगावर घ्यायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला जागा तरी द्यायला पाहिजे.”
“ते तू वकील झाल्यावर बघू.” मी मनात म्हटले आणि कामाकडे वळले.
ओळख झाल्यावर त्यांना विचारले, ‘तुम्हाला इथे येऊन काय शिकायचे, काय करायचे आहे.’
एकेकाला विचारले तर सर्वांचे उत्तर एकच. “ग्रामर!”
“कोणत्या भाषेचे?”
हा प्रश्न त्यांना अनपेक्षित होता. ग्रामर तर एकाच भाषेला असते. मराठीला कसले आलेय ग्रामर?
“अरे मुलांनो, ग्रामर हा काही वेगळा विषय नसतो. ग्रामर शिकायचेय म्हणजे तुम्हाला इंग्रजी भाषा शिकायचीय असं म्हणा. भाषा आली की तिचे व्याकरण आलेच.”
मुलांनी मान्य केले. त्यांचा मुख्य प्रश्न भाषा शिकण्याचाच होता.
“तुम्हाला तुमची भाषा येते का पण?”
मग, हा कसला आलाय प्रश्न, असा भाव तर त्यांच्या चेहऱ्यावर आला, पण त्यांनी बिनधास्त होय म्हणून उत्तर काही दिले नाही. मी आणखी स्पष्ट केले.
“तुमची सर्वांची भाषा मराठीच आहे ना? मग ती तुम्हाला येते का? भाषा येणे म्हणजे फक्त त्या भाषेत आपल्या गरजा सांगता येणे एवढेच नव्हे, तर आपल्या भावनांचे व्यवस्थापन करता येणे, आपले विचार मांडता येणे, समोरच्या व्यक्तीकडून त्याचे विचार ऐकून, समजून घेता येणे, युक्तिवाद करता येणे, इ. हे सारे तुम्हाला मराठीतून करता येईल का? मराठीतील उत्तम काव्य, साहित्य तुम्ही वाचता का? एखाद्या विषयावर तुम्हाला मराठीतून दहा ओळी लिहायला सांगितल्या तर लिहिता येतील का कुठेही न  पाहता?”
मुले निःशंकपणे ‘नाही’ म्हणाली.
“मग आधी तर आपलीच भाषा शिकावी लागेल. इंग्रजीदेखील शिकवली जाईल, पण नंतर. बरं मला आधी हे सांगा की भाषा शिकायचीच कशाला?”
ह्यावर पुन्हा हा कसला आलाय प्रश्न असा भाव. मग थोडीफार उत्तरे.
मी म्हटले, “आपल्या मनातल्या गोष्टी दुसऱ्याला समजतील अशा प्रकारे शांतपणे सांगता आल्या पाहिजेत ना? आपल्याला त्यासाठी भाषा लागते. आपले म्हणणे मांडता आले नाही तर तुम्हाला काय वाटते? स्वतःचाच राग येतो की नाही? आणि अनेकदा तो दुसऱ्यावर काढला जातो की नाही? बोलता नाही आले की कसे तुम्ही फायटिंगवर येता? येता की नाही? तर तशी वेळ येऊ नाही म्हणून भाषा हवी. अहिंसा म्हणजे हमरीतुमरीवर न येणे. त्यासाठी दुसऱ्याचे ऐकून घेता आले पाहिजे आणि आपले सांगता आले पाहिजे. मग मुलांकडून ‘अहिंसेसाठी भाषा’ हा पाठ वदवून घेतला. हा होता आमचा पहिला धडा. एक बरे आहे की इथे सेवाग्रामला ‘अहिंसा’ वगैरे शब्द मुलांच्या कानावरून गेले आहेत.
दुसऱ्या दिवशी मुलांना खेळ खेळायला लावला. सगळ्यांनी गोल बसायचे. प्रत्येकाने आपल्या स्वभावातील एक गुण सांगायचा. खेळ सुरू झाला. रंगू लागला. तशी आपली तारीफ करण्याची वेळ लहान मुलांवरच काय, समंजस अशा मोठ्या माणसावरदेखील येत नाही. त्यामुळे ती रंगून गेली होती. अशातच,  दहावीत शिकणारा एक मुलगा जरा तोऱ्यात म्हणाला,
“मी कधीही माझ्यावर झालेला अन्याय सहन करीत नाही.”
अरे बाप रे! आपली तर कधीच हिंमत झाली नसती असं काही म्हणण्याची. कितीतरी अन्याय आपण गप्प राहून सोसलेत, ते आठवून मला भडभडून आले. पण तसेही ते फार सोपे नाही. “अन्याय सहन करीत नाही म्हणजे काय? तुझ्यावर अन्याय झाल्यास तू काय करतोस? सत्याग्रह? ”
पुन्हा तेच. प्रश्न कळला नाही. “अन्याय तू कशाला म्हणतोस हेच प्रथम विचारायला हवे.”
“तुझ्या दृष्टीने अन्याय म्हणजे काय?”  उत्तर नाही. “तुला कॉलेज प्रवेशासाठी देणगी द्यावी लागली, तर तो अन्याय होईल का?”
ह्यावरही उत्तर नाही. बहुधा त्याची अन्यायाची कल्पना सरांनी किंवा वडिलांनी चुकीच्या प्रमाणात जास्त मार देणे, परीक्षेत उत्तर लिहूनही कमी मार्क मिळणे, आवडत्या मुलीला ‘लाइन’ मागितल्यावर तिने न देणे एवढ्यापुरतीच असावी.
पुढे आणखी कठीण प्रश्न विचारला. “तुझ्या ताईच्या लग्नात वरपक्षाने हुंडा मागितला, तर तो तुमच्यावर अन्याय होईल का?”
त्याला काही कळलं नाही. पण एकूण सगळा रागरंग पाहून तो म्हणाला, “होय.”
“मग त्यावर तू काय उपाय करशील? अन्याय तर सहन करायचा नाही आपल्याला.”
“..........”

हेही वाचलंत का?
गमंतशाळा (भाग १)
पालक आणखी काय काय विकणार आहेत?

मग आम्ही एक नाटक बसवले. अन्याय सहन न करणारा मुलगा प्रणित, त्याचे आईवडील, आजी-आजोबा, वरपक्षाकडील काही माणसे अशी सर्व पात्रे होती. कथानक साधारण असे :
प्रणितच्या ताईचे लग्न ठरते. सगाई होते. त्यानंतर लग्न जवळ आल्यावर त्यांच्याकडे हुंड्याची मागणी केली जाते. ही गोष्ट घरच्यांकडून नाही, तर शेजाऱ्यांकडून प्रणितच्या कानावर पडते. त्याला हे मान्य नाही. पण घरचे लोक मात्र इकडून तिकडून काहीतरी सोय करून हुंडा देण्याच्या तयारीत असतात. तो आपला निषेध आई व वडील ह्यांच्याकडे नोंदवतो. अशा ठिकाणी ताईचे लग्न करू नये म्हणून विनंती करतो, पण त्याचे कुणी ऐकून घेत नाहीत. तू लहान आहेस, तुला काय कळतंय, एवढे चांगले स्थळ हातचे जाऊ द्यायचे नाही, असे म्हणून त्याला वाटेला लावतात. हुंडा मागणारे स्थळ चांगले कसे असू शकते, हा प्रणितचा प्रश्न आहे. त्याच्या ताईलाही आपले हुंडा देऊन लग्न पसंत नाही. पण तिला कोण विचारतोय? प्रणित मात्र हा प्रश्न धसास लावतोय. त्याला अन्याय सहन करायचा नाहीय.
“आता पुढे काय करायचं नाटकात?” आई-बाबांनी त्याला वाटेला लावल्यावर मी सर्वांना विचारले, “आता कोण त्याच्या मदतीला येईल?”
“अप्पाजी (आजोबा),” मुले सांगतात. आपल्या कथानायकाला जिंकवून द्यायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ठीक. मग प्रणित अप्पाजींकडे जाऊन त्यांची मदत मागतो. ते मात्र त्याचे ऐकून घेतात. ते आपल्या मुलाशी (प्रणितच्या वडिलांशी) बोलतात. मग प्रणितचे बाबा थोडे नरम येतात. मग प्रणित, त्याच्या घरची मंडळी, लग्न ठरवून देणारा मध्यस्थ, गावचा प्रमुख, शेजारचे बुजुर्ग काका वगैरेंची एक बैठक घेतो. आपली ताई गुणी मुलगी आहे, ती शिकलेली आहे, ती पुढे नोकरीही करू शकेल, तिच्यासाठी हुंडा मागणे योग्य नाही वगैरे सांगतो. आपण आपला हुंडा न देण्याचा निर्णय लवकरात लवकर वरपक्षाला कळवावा म्हणून तो वडिलांकडे हट्ट धरतो.
“आता आपल्या - म्हणजे प्रणितच्या बाजूचे मुद्दे कोणते?,” मी विचारले.
“एक म्हणजे त्यांनी सगाई झाल्यानंतर हुंडा मागितला. आधी नाही.”
“बरोबर. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आम्ही तर कोणत्याही परिस्थितीत देणारच नव्हतो. तुम्ही आधी म्हटले असते तर आम्ही लग्नच नसते ठरवले. आणखी काय? ”
“आपल्या समाजात अजून वाट्टेल तेवढी मुलं पडली आहेत.”
‘हो. हेही बरोबर.” या मुद्द्याची तर मला गंमतच वाटली. तरी बरं आपल्या वर्गात सगळी मुलेच होती. मुली नव्हत्याच.
ह्या मुद्द्यांवरून आपल्या वडिलांना पटवायचा प्रयत्न करतो. आधी ते लग्न मोडेल, गावात आपली बेइज्जती होईल वगैरे कारणे सांगून टाळाटाळ करतात, पण शेवटी इतर ज्येष्ठांचेही त्यांना ऐकावे लागतेच....  तर आता प्रणितच्या वडिलांनी आपण हुंडा देणार नसल्याचे वरपक्षाला कळवले आहे. तेव्हा आता बॉल वरपक्षाच्या क्षेत्रात आहे.
“मग आता काय होणार?” मी विचारले.
मुले विचारात पडली. त्यांना काही सुचले नाही.
“आपण असे करू या, की मग वरपक्षाचीही बैठक होते. आता काय करायचे ह्यावर चर्चा होते. केवळ हुंडा मिळत नाही म्हणून का इतके चांगले स्थळ हातचे जाऊ द्यायचे? मग त्यांच्याकडेही एक आजी असते. ती शहाणी असते. ती म्हणते, हे बघा, मुलगी गुणाची आहे. शिकलेलीही आहे. त्यांच्याकडे हुंडा मागणे बरे नव्हे. शिवाय आपल्याकडेही काय कमी आहे तसे पाहिले तर? तेव्हा हे लग्न काही मोडू नका.” मग लग्न ठरते आणि होतेही. असा त्याचा शेवट होतो.
त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त कथाच वाचून दाखवल्या. लहान मुलांची खूप पुस्तके घरात आहेत. आमच्या मुलींच्या लहानपणची सांभाळून ठेवलेली पुस्तके, मासिके, ‘चकमक’चे अंक हे सगळे उपयोगी पडत आहे. कथावाचनाची सुरुवात साप्ताहिक साधनाच्या बालकुमार अंकांपासून केली. त्यातल्या काही कथा साभिनय वाचून दाखवल्या व मुलांना त्यावर प्रश्न विचारले. मुलांनी त्यांची चांगली उत्तरे दिली. त्यावरून लक्षात आले, की त्यांनी लक्ष देऊन कथा ऐकली होती. ती त्यात रंगून गेली होती. मग काही गोष्टी ध्यानात आल्या —
१. ऐकून समजून घेऊ शकणारी ही मुले आहेत.
२. त्यांची मराठी बोलीभाषा प्रमाणभाषेपेक्षा खूप वेगळी आहे. मी स्वतःला एवढी वऱ्हाडी म्हणवून घेते, पण मलादेखील ती परिचयाची नाही. ते भिंतीवरच्या पालीला इजगरी म्हणतात. शेवाळाला चीला म्हणतात. हे शब्द मला माहीत नाहीत.
३. असे असले तरी त्यांना प्रमाण मराठी कळते. बोलता मात्र येत नाही. उत्तरे देताना ते त्यांच्या बोलीभाषेत देतात.
४. साभिनय कथाकथन, नाटक बसवणे वगैरे त्यांना खूप आवडते.
५. काही मुलांच्या वाणीत दोष आहे. ती भिऊन गप्प बसतात. अशी मुले आकलनात ठीकठाक असली, तरी ती मतिमंद (वऱ्हाडी भाषेत ‘बह्याड’) समजली जातात. कालांतराने ती स्वतःही स्वतःला तसेच समजू लागतात.

(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
- संपर्कः ९८८१४४२४४८, [email protected]
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभवकथन , भाषा , शिक्षण , प्रयोगशील शिक्षण , नावीन्यपूर्ण शिक्षण , मराठी अभ्यास केंद्र , अनुराधा मोहनी , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen