राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. विविध सेवा आणि विभाग सुरू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा हा लेख -
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील २४ जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित भागातील शाळाही हळूहळू सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे बहुतांश पालकांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील नागरीकांना कोविड-१९ प्रतिबंधाबाबत ‘मास्क वापरा, हात धुवा आणि सुरक्षित अंतर राखा’ असे आवाहन केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस अजून उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर आपण आता कोरोनासह जगण्याची तयारी करायला हवी. त्यामुळे शाळा सुरू करताना योग्य ती खबरदारी घेऊनच आपल्याला त्या सुरू कराव्या लागणार आहेत. या पुढील काळात शाळेशी संबंधित सर्वच घटकांची जबाबदारी महत्त्वाची असणार आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, आदी सर्व घटकांनी या काळात पुरेशी काळजी घेतली, तर कोरोना संसर्गाच्या या जागतिक महामारीवर आपण सहज मात करू शकतो. शाळेतील सर्वच घटकांनी योग्य तो समन्वय ठेवून निर्धारित जबाबदाऱ्या पार पाडणे महत्त्वाचे राहील.
हेही वाचलंत का?
नवीन राष्ट्रीय शेक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षण
शालेय शिक्षण - टाळेबंदीतील आणि नंतरचे
शालेय व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या जबाबदाऱ्या:
- कोविड-१९ प्रतिबंधाबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करणे.
- शाळेचा परीसर, इमारत आणि त्यातील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे यांची वेळोवेळी स्वच्छता, साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करणे.
- शाळेत थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पुरेसे स्वच्छ पाणी, यांची व्यवस्था करणे.
- शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्याची व्यवस्था करणे.
- शाळेच्या परीसरात, वर्गात आणि वर्गाबाहेरही, शाळेशी संबंधित सर्व घटकांना मास्कचा वापर बंधनकारक करणे.
- शाळेच्या परीसरात वाहनांची गर्दी होणार नाही या दृष्टीने योग्य ते नियोजन करणे.
- मुलांना रांगेत उभे राहण्यासाठी आणि वर्गात बाकावर बसण्यासाठी योग्य त्या ठिकाणी चिन्हांचा वापर करणे.
- शाळेशी संबंधित अशा सर्व भागधारकांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून विविध समित्या स्थापन करणे.
- आवश्यक तेथे पालकांचे आणि शाळेशी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे.
- विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून लेखी संमतीपत्र घेणे.
- कोविड-१९ प्रतिबंधासंदर्भात जागृती करणारी पोस्टर्स शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे.
- शाळेच्या परीसरात वाहनांची गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करणे.
- पालकसभांतून कोविड-१९बाबत जागृती करणे.
- शाळा सुरू असताना वर्गखोल्यांचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- शाळेतील कचरा वेळोवेळी उचलण्यात यावा.
- शाळेत येण्याच्या-जाण्याच्या आणि मधल्या सुट्टीच्या वेळा वेगवेगळ्या असाव्यात.
- विद्यार्थ्यांच्या वर्गात बसण्याच्या जागा निश्चित कराव्यात.
- विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित करावेत.
- एका बाकावर एकच विद्यार्थी बसू शकेल अशी व्यवस्था करणे.
- गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सर्व मुलांना एकदम न बोलावता ठरावीक वेळेचे अंतर ठेवून बोलावणे.
- गर्दी टाळण्यासाठी एक दिवसआड करून ५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे.
- प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तास इतका ठेवणे.
- वर्गात आणि वर्गाबाहेर सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील याकडे लक्ष देणे.
- स्वच्छता गृहात गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करणे.
पालकांची जबाबदारी:- मुलांना मास्क घालून पाठवणे.
- त्यांना स्वच्छ आणि धुतलेला मास्क द्यावा.
- मुलांबरोबर पाण्याची बाटली आणि हातरुमाल देणे.
- मूल आजारी असल्यास त्याला शाळेत पाठवू नये.
- कुटुंबातील सदस्य कोविड-१९ ने बाधित असतील तर काही दिवस मुलांना घरी ठेवावे.
- कोविड-१९ काळातील सुरक्षा उपाययोजनांबाबत मुलांशी संवाद साधावा.
- कोविड-१९बाबतची भीती कमी करणे आणि नेमकी माहिती मुलांपर्यंत देणे.
- शालेय प्रशासनाला सहकार्य करणे.
विद्यार्थ्यांची जबाबदारी:- मास्कचा व्यवस्थित आणि नियमित वापर करणे.
- मास्कची अदलाबदल करू नये.
- वर्गात आणि वर्गाबाहेर सुरक्षित अंतर ठेवणे.
- वारंवार हात धुणे.
- वस्तूंची देवाणघेवाण शक्यतो करू नये.
- एकमेकांना स्पर्श करू नये.
- चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावेत.
- एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये.
- शाळेच्या मैदानावर, वर्ग आणि स्वच्छता गृहे, या ठिकाणी योग्य अंतर ठेवावे.
- आजारी असल्यास घरीच राहावे.
- आवश्यक तेवढेच साहित्य बरोबर बाळगावे.
याशिवाय प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतरही परिस्थिती पाहून ऐनवेळी काही बदल करावे लागतील. या पुढील काळात विद्यार्थी आणि पालकांबरोबरचा सुसंवाद महत्त्वाचा असणार आहे. शाळांनी पालक सभांतून समुपदेशक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना शाळांत निमंत्रित करून विद्यार्थी आणि पालकांच्या कोरोना संसर्गासंबंधी सर्व शंकांचे निरसन करणे गरजेचे राहील. राज्यातील अनेक शाळांनी अशा प्रकारे सभा घेऊन विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधला आहे. सध्या मुले ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शाळेशी जोडली आहेत. त्यामुळे मुले आणि पालक या दोघांपर्यंत योग्य त्या सूचना पोहोचवणे आता सहज शक्य आहे. विद्यार्थ्याची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर असणार आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग शाळांना होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. शाळा सुरू झाल्यानंतर काही विदयार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू शकणार नाहीत, अशा मुलांसाठी पूर्वीप्रमाणे ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत.
कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सध्या तरी अध्यापनाव्यतिरिक्त इतर उपक्रमांच्या आयोजनास मनाई आहे. काही महत्त्वाचे विषय या कालावधीत शिकवले जाणार आहेत. यात गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर मुख्यतः भर दिला जाणार आहे. कोविड-१९वर सध्या ‘प्रतिबंध’ हाच उपाय आहे. योग्य ते सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हातांची स्वच्छता पाळल्यास कोरोना संसर्गाच्या या आव्हानाला आपण सर्व सहज सामोरे जाऊ शकतो. गरज आहे ती सर्वच घटकांच्या सहकार्याची.
- मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक नंदादीप विद्यालय, गोरेगाव, मुंबई येथे इंग्रजीचे शिक्षक आणि समुपदेशक आहेत)
संपर्क - ९८९२८३०६६३, [email protected]
फोटो सौजन्य - गूगल
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कोरोना
, शाळा. टाळेबंदीनंतरचे शिक्षण
, मच्छिंद्र बोऱ्हाडे
, नंदादीप विद्यालय
, मराठी अभ्यास केंद्र