गंमतशाळा - (भाग ३)


शाळा-महाविदयांपेक्षा खरं शिक्षण मुलं बरेचदा बाहेरच्या जगातूनचनैसर्गिक वृत्तीने आणि आपापल्या वकुबानुसार मिळवतात. बऱ्यावाईटाची सरमिसळ असलेल्या बाहेरच्या अफाट जगातून बऱ्याची निवड करण्यासाठी मुलांना कसं काय प्रवृत्त करायचं? सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी  ‘गंमतशाळा’ या सदरातून मुलांसोबत आलेले अनुभव मांडतायत -

काही दिवसांनी आमची नागपूरला जाण्याची वेळ येऊन ठेपली. नागपूर व मुंबई करून मी १७ दिवसांनी परत आले. एक-दोन दिवस बाहेरची कामे केली. तिसऱ्या दिवशी यावे म्हणून सर्वांना निरोप दिला होता. आमची निरोप देण्याची पद्धत म्हणजे घरची मदतनीस कमळाबाई हिला सांगणे. (तिला तसेही सांगावेच लागते.) तिची नातवंडे आम्ही गावात आल्याची बातमी प्रसृत करतात. पण, तिसऱ्या दिवशीही बराच वेळपर्यंत कुणी आले नाही. आपण चांगले शिकवीत नाही की काय? माझ्या मनात प्रश्न आला. मुले आता येणारच नाहीत की काय... ?

अंधार पडला होता. विस्तीर्ण आकाशात चंद्राची कोर चमकत होती. निशिगंधाच्या छड्या आपला दरवळ आसमंतात फेकीत होत्या. ह्या साऱ्या समृद्धीकडे पाठ फिरवून  मी आपली वर जाऊन कंप्युटरसमोर बसले. एवढ्यात कसलासा आवाज झाला. धडपडत खाली गेले पाहायला. तो काय! ३-४ मुले माकडासारखी फाटकावर चढत होती. वर चढून त्यांनी पटापट आत उड्या टाकल्या.
ते पाहून मला खूपच आनंद झाला. “अरे वा! कशी काय आलात तुम्ही इतक्या उशिरा? मला तर वाटले की तुम्ही आता येतच नाही.”
“आम्ही तर मघाशीही एकदा येऊन गेलो होतो. आम्हाला परत पाठवले.”
“कुणी ते?”
“पनूच्या आईने.” प्रशांतची आजी. इथे सगळे लोक आईवडिलांना मम्मी-पप्पा आणि आजीआजोबांना आई व अप्पाजी असे म्हणतात.
“कशाला?”
“काय माहीत?  ती म्हणाली परत जा. आज क्लास नाही.”
कमळाबाईने असे का केले असेल ते काही समजले नाही. नेहमीच ती आपल्या सोबत उभी राहते. तसेच तिची तीन तीन नातवंडे आपल्याकडे शिकतात. तेव्हा क्लास बंद पडला तर तीही वंचित राहतील, एवढेही  तिला सुचू नये काय? दुसऱ्या दिवशी ती कामावर आल्यावर तिला जरा फैलावर घेतले. त्याचा चांगला परिणाम झाला व त्या दिवशीपासून सर्व मुले येऊ लागली.
गंमतशाळेला पंधरा दिवस झाले असतील-नसतील, एक दिवस माझे मनगटी घड्याळ दिसेनासे झाले. मला काहीच सुचेना. घरभर शोध-शोध शोधले. थोड्या वेळाने जरा मन शांत करून, ते सगळ्यात शेवटी केव्हा घातले होते ते आठवून पाहिले. परवा सायंकाळी मी बाहेरून उशिरा आले होते. कंटाळून बैठकीच्या खोलीत दिवाणावर बसले होते. तेव्हा मी घड्याळ तेथेच छोट्या टेबलावर काढून ठेवल्याचे मला आठवले. मग मी बराच वेळ तेथेच बसून फोनवर बोलत होते. घड्याळ तेथून उचललेच नाही...

हेही वाचलंत का?
गंमतशाळा (भाग २)
गंमतशाळा (भाग १)

मनात उलटसुलट विचारांचा गोंधळ उडाला. आपण ह्या मुलांना चांगले घडविण्यासाठी बोलवीत आहोत. ह्यातून काय निष्पन्न होणार? मुलांमध्ये खरंच काही फरक पडणार आहे की आपल्याच वस्तू एकेक करून घराबाहेर जाणार? काय करायचे आता? मुलांना सांगायचे का? कसे? शाळा तर आपल्याला घरातच भरवावी लागणार. बाहेर कुठे जागा आहे? आणि एकट्या दुकट्यासाठी सगळ्यांवर अविश्वास कसा बरे दाखवायचा? अशाच अस्वस्थ मनःस्थितीत असताना मी मुलांना सांगून टाकले, “हे बघा, माझे घड्याळ सापडत नाहीय. तुमच्यापैकी कुणाला दिसले का? रस्त्यावर पडलेले जरी दिसले तरी प्लीज आणून द्या. शक्य आहे की मी रस्त्यावरून जाताना हातातून पडले असेल.” असे म्हणून त्यांच्यासाठी निरागसपणाची जागा करून दिली. दुसऱ्या दिवशी सगळे चिडीचूप. हां. एक मुलगा मात्र आला नाही आणि इतर मुलांनी त्याचे नाव घेतले. त्याला उचलेगिरीची सवय आहे असे म्हटले. कुणाचा बॅटबॉल तर कुणाचे कंचे (गोट्या) त्याने पळवले होते हेही सांगितले. तसाही तो ओव्हरस्मार्ट वाटायचाच. शोधण्याच्या कामाला मात्र सगळ्यांनी हातभार लावला. मोठ्या मुलांनी म्हणे त्या मुलाला जाऊन विचारले, तू घड्याळ घेतलेस का? तो म्हणाला मुळीच नाही. हवे तर घरात येऊन पाहून जा. कमळाबाईही सगळ्या आसपासच्या पोरांशी बोलल्या म्हणे. “ताई तुमच्यासाठी एवढे करतात, तुम्ही त्यांची वस्तू घेणे बरोबर नाही. चुकून जरी आणली असेल तरी त्यांचे त्यांना परत नेऊन द्या.” असे करून तिसरा दिवस गेला. मी मनातून आशा सोडली होती. आपण ज्या कामाला हात घातला आहे, त्यात असे काही होतच राहणार. आता पुन्हा किमती वस्तू बाहेर ठेवण्याचा निष्काळजीपणा करायचा नाही. मी स्वतःला बजावले.

दरम्यान सेवाग्राम आश्रमात मेडिको फ्रेंड्स् सर्कलची बैठक चालू होती. मी तेथे मनीषाताईला (मनीषा गुप्ते) भेटायला गेले. आमच्या नेहमीप्रमाणे खूप छान गप्पा झाल्या. आमच्या नात्याची गंमत अशी की, ही मुळात माझ्या नवऱ्याची मैत्रीण. पण, माझ्यासाठी खरोखर मोठ्या बहिणीसारखी आहे. कितीही दिवस न भेटता-बोलता गेले असले तरी आम्ही पुन्हा तेवढ्याच उत्कटतेने भेटतो. तेव्हा रवींद्र गावाला गेला होता आणि तिला घरी यायला वेळ नव्हता. म्हणून मी तिला भेटायला गेले. तिने सध्या काय नवीन चाललेय म्हणून विचारले. मी ह्या कामाबद्दल सांगितले. त्यात येणारे मजेदार अनुभव तिच्याशी शेअर केले. आणि मग म्हटले, “...पण, माझं घड्याळ दिसत नाही आहे चार दिवसांपासून...” ह्यावर मात्र तिने आपत्ती प्रकट केली आणि सामाजिक कार्याचा अर्थ असला चांगुलपणा होत नाही, हे अगदी निक्षून सांगितले. तिने असे सुचविले की मी त्या मुलांना विश्वासात घेऊन सांगावे. “तुमच्यातल्या एका कोणीतरी हे घेतले आहे, पण माझा तर सर्वांच्याचवरील विश्वास उडून गेला! बघा ना, एकाने केलेल्या वाईट कामाचे फळ सगळ्यांना भोगावे लागत आहे... आणि विश्वास गमावण्याचे परिणाम किती भयावह असतात माहीत आहे का? आपल्यामध्ये जो नातेसंबंध तयार झाला होता आणि मी तुम्हाला प्रेमापोटी जे शिकवत होते, त्यालाच आता तडा गेला ना .....”
मग मुलांशी येऊन मी तशा प्रकारे बोलले. झाल्या प्रकाराने मी अतिशय दुःखी झाले आहे असे म्हटले. ते म्हणताना खरोखर माझ्या डोळ्यांतून आसवे आली. चौथा दिवस संपला. मुले घरी गेली. पुढच्या दिवशी सकाळी मी घरातले काम करीत होते तेव्हा दोन-चार मुले धावत फाटकाबाहेर येऊन पोहोचली.
“राधाआक्का” ती जोरात ओरडली. आमचे गावात टाकलेले वर्तमानपत्र ही मुलेच रस्ता ओलांडून आमच्याकडे आणून देतात. पण आज तर ती ते देऊन गेली होती. मग काय असेल? मी बाहेर गेले. तर त्या मुलांनी घड्याळ धरलेला हात फाटकातून आत टाकून  विचारले,
“हे तुमचं आहे का ?”
“अरे हो की! कुठे मिळालं?”
“त्या--- तिकडे पडलं होतं.....”
“कुठे?”
“त्या तिकडे खड्ड्यात”
“दाखवा बरं, कुठे ते?”
“आम्ही पेपर देऊन जाताना खड्ड्यात काहीतरी चमकताना दिसले. काय आहे म्हणून पाहतो तर घड्याळ. मग ही मुलगी त्यात उतरली आणि तिने ते काढून दिले. असे म्हणून त्या मुलांनी  आवारातील एक खड्डा दाखवला. तेथून मी घड्याळ घालून गेलेच नव्हते. त्यामुळे कोणीतरी ते तेथे आणून टाकले होते एवढे नक्की. तेथे आणून टाकले होते, की मुलांकडेच दिले होते डायरेक्ट, हेही कळायला मार्ग नाही. मिळाले, एवढे मात्र खरे. त्या दिवशी सायंकाळी मी वर्गात ते मिळाल्याचे जाहीर केले व रोज आम्ही ध्यान करतो तेव्हा ‘मला दुसऱ्याची वस्तू त्याला न विचारता घेण्याची बुद्धी कधीही होऊ देऊ नकोस’ अशी परमेश्वराची प्रार्थना करायला सांगितले.
(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
- संपर्कः ९८८१४४२४४८, [email protected]
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभवकथन , भाषा , शिक्षण , प्रयोगशील शिक्षण , नावीन्यपूर्ण शिक्षण , मराठी अभ्यास केंद्र , अनुराधा मोहनी , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen