ग. भा. मेहेंदळे यांचा जन्म १९ - १२ - १९४७ चा. महाराष्ट्रात मराठा इतिहासात उग्र ज्ञानसाधना करणाऱ्या इतिहासकारांची एक मोठी परंपरा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते ग. ह. खरे यांच्या पर्यंत आहे. आजच्या घडीला अशी ही परंपरा समर्थपणे कुणी पुढे नेत असेल तर ते म्हणजे गजानन मेहेंदळे !
शिवचरित्र हा महाराष्ट्रात भावनेचा विषय आहे. अभ्यासाचा नाही. मेहेंदळे यांनी मात्र तो विषय अभ्यासाला घेतला. त्यांनी या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली ती सुमारे १९६९ साली. तेंव्हापासून आज पर्यंत अखंडपणे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरु आहे. त्यातून आजवर त्यांनी दोन मराठी व एक इंग्रजी भाषेतील इतिहासग्रंथ सिद्ध केला आहे.
त्यांनी मराठीत लिहिलेले शिवचरित्र दोन खंडात प्रकाशित झालं आहे. हे दोन खंड मिळून मासिक आकाराची सुमारे अडिच हजार पाने भरतात. तरीही ते शिवचरित्र अपुरे आहे. यात ते शिवकालीन इतिहास सांगत अफजलखान प्रकरणापर्यंत आले आहेत. आणि इतर काही परिशिष्ठं ! मराठीत त्यांचा अजून एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे तो म्हणजे 'शिवछत्रपतींचे आरमार' ! त्यांनी इंग्रजी भाषेतूनही एक शिवचरित्र लिहिले आहे. ते सुमारे एक हजार पृष्ठांचे आहे. त्यात शिवपूर्वकाळापासून ते शिवरायांच्या मृत्युपर्यंत पूर्ण इतिहास आला आहे.
काटेकोरपणा हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ! आपल्याला त्यांच्या ग्रंथात एकही विधान पुराव्याशिवाय केलेले दिसणार नाही. मराठी शिवचरित्रात तर आपल्याला अशी स्थिती दिसते की वरचा ३५ टक्के भाग हा विधानांनी व्यापला आहे, तर खालच्या ६५ टक्के भागात पुराव्यांची चर्चा आहे. उदाहरणादाखल त्यांची पद्धत सांगतो. समजा त्यांनी एखादे विधान केले, तर हे उघडंच आहे की ते कोणत्या तरी साधनांवर (साधन - स्रोत किंवा पुरावा) आधारीत असणार. मग खाली तळटीप देउन तो पुरावा नीट नोंदलेला दिसतो.
पण बहुतांश वेळी ही प्रक्रिया इतकी सरळ वा सुलभ नसते. वेगवेगळ्या साधनांत काही प्रमाणात तरी वेगवेगळी माहिती मिळते. मग त्यातली कोणती माहिती स्वीकारायची हा प्रश्न इतिहासकारांसमोर उभा असतो. मग तळटीपेत मेहेंदळे सर आपल्याला विविध साधनांत काय काय माहिती मिळते ते सांगतील. मग त्यातली कोणती माहिती किती प्रमाणात व का स्वीकारली हे आपल्याला तर्कशुद्धपणे सांगतील. काही साधनातील माहिती त्यांनी नाकारली असेल, तर ती का नाकारली हेही सविस्तर सांगतील. ही त्यांची इतिहासलेखनाची पद्धत आहे.
आजवर इतकं तपशीलात उतरून, बारकाईने चिकित्सा करून इतिहासातले 'तपशील' कुणी निश्चित केल्याचं निदान मी तरी पाहिलेलं नाही. परिणामी मेहेंदळे यांनी दिलेले इतिहासातील तपशील पुराव्यांच्या पक्क्या खडकावर उभे असतात. त्यांच्या लेखनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे पुरावाच नाही अशा जागा रिक्त ठेवणे.
बऱ्याचदा होतं असं की इतिहासात कित्येक जागा अशा असतात, की तिथे पुरावाच उपलब्ध नसतो. मग इतिहासकारालाही त्या रिक्त जागा 'स्वत:च्या' तर्काने भरण्याचा मोह होतो. आणि एकदा का इतिहासकाराने ती जागा भरून काढली की सामान्य वाचकांच्या दृष्टीने ती एक प्रस्थापित वस्तुस्थिती बनते. मेहेंदळे यांनी हा मोह कटाक्षाने टाळलेला दिसेल. त्यांनी जे शिवचरित्र लिहिले त्यामुळे एकुण शिवचरित्रात काय भर पडली, हा निराळा विषय आहे. त्याविषयी स्वतंत्रपणे लिहावं लागेल.
मी जे आज लिहितो आहे ते मूलत: इतिहासलेखनपद्धती विषयी. मेहेंदळे यांचं इतिहासलेखनशास्त्रातील अजून एक महत्त्वाचं योगदान म्हणजे साधन-चिकित्सा ! मेहेंदळे यांनी जो परिशिष्ठ खंड लिहिला आहे त्यातली सुमारे ८०० पानं वेगवेगळ्या मुद्द्यांच्या निमित्तानं केलेल्या साधनचिकित्सेने व्यापली आहेत. त्यात 'ऐतिहासिक कागदपत्रांच्या खरेखोटेपणाचे परीक्षण' या नावाचा ११९ पानांचा लेखच आहे. बनावट कागदपत्रं कशी ओळखावीत हे इतक्या तपशीलवारपणे आजपर्यंत कुणीही समजावलेले नाही.
उर्वरीत पानं ही वेगवेगळ्या साधनांच्या चिकित्सेत खर्ची घातली आहेत. त्यांच्या अन्यही सर्वच लेखनात ही साधन-चिकित्सा सातत्याने सुरु असते. तपशील निश्चित करताना तो शास्त्रीय पुराव्यांवरच आधारलेला असला पाहिजे, याविषयी त्यांचा सतत हट्ट सुरु असतो. त्यांच्या लेखनात एखादं ढिसाळ विधान दाखवून देणे फारच अवघड आहे.
ज्याला इतिहासलेखनशास्त्र शिकणे असेल विशेषत: मराठा इतिहास काळासंबंधी, त्यास मेहेंदळे यांचा ग्रंथ वाचल्याविना गत्यंतर नाही. इतिहासलेखनशास्त्राच्या उपयोजनात त्यांच्या इतकं काम आजवर कोणीही केलेलं नाही. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभो आणि जी प्रचंड कामं त्यांनी हाती घेतली आहेत ती त्यांच्या कडून पार पडोत. त्यांच्यामुळे इतरांनाही इतिहास अभ्यासाची प्रेरणा मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करून मी थांबतो !
: लेखक- प्रा. संतोष शेलार
**********
Google Key Words - Historian, Marathi Historian, Gajanan Bhaskar Mehandale, Raja Shivachhatrapari, Shivcharitra
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे
निवडक सोशल मिडीया
संतोष शेलार
2021-07-17 16:00:02

प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

कला-साधना 'राजमान्य' होते
अज्ञात | 3 दिवसांपूर्वी
काव्याचा निष्ठावंत अभ्यासक म्हणून डे प्रसिद्ध आहेत.
गांधीजी आणि पितृत्व
प्रभाकर दिवाण | 6 दिवसांपूर्वी
गांधीजींचा लहान मुलगा खाण्याचा विलक्षण हट्ट घेऊन बसायचा.
माझ्या अभिनेत्री कन्यका
शोभना समर्थ | 2 आठवड्या पूर्वी
नूतनच्या या यशावर तनुजाचें यश पडताळून पाहणं आज तरी इष्ट ठरणार नाहीं
रहस्यनिरीक्षण
महादेव मल्हार जोशी | 2 आठवड्या पूर्वी
तुम्हांला ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला आहे काय ?