ब्राह्मण (कथा-ऑडीओसह)

पुनश्च    आनंद रेगे    2020-05-20 06:00:46   

अंक : आलमगीर, दिवाळी अंक १९५९ 

कथेबद्दल थोडेसे: श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्हींचा जन्म भीतीमधून होत असतो. मानवी मनाला भीती नामक भावना नसती तर कदाचित देव या संकल्पनेचाही जन्म नसता झाला. या भीतीच्या भावनेतूनच आपण अनेक गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडत असतो. अशा भावनांना जेंव्हा योगायोगाची जोड मिळते तेंव्हा तो समज अधिकच दृढ होतो. अनेकदा तर हे योगायोग एवढे जबरदस्त असतात की त्यांना योगायोग म्हणायलाही आपली जीभ कचरते आणि वाटू लागते..लोक म्हणतात त्यात नक्कीच तथ्य असलं पाहिजे...याच भावनेतून मग अशा कथा जन्माला येतात. मानवी मनाचे विविध पैलू सांगणारी ही कथा ६० वर्षापूर्वींची असली तरी त्या कथेतील भाषा वगळता सर्व काही 'आजचे' आहे..( वाचा किंवा ऐका)

१९५९  च्या आलमगीर,दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा तुमच्यासाठी पुनश्च... *********

आमचे तात्या गोष्टीवेल्हाळ . सत्तर वर्षांतल्या आयुष्यांतील त्यांचे अनेकरंगी अनुभव कधी नी कसे बोलू लागतील याचा नेम नाही. एकदां का बोलायला त्यांची सुरवात झाली की मग रानांतल्या एका पायवाटेंतून जशा अनेक वाटा फुटतात तशीच त्यांच्या गप्पांची गत होते. अनेक विषय टांचांखाली घालून जेव्हा त्यांच्या गप्पा चौखूर उधळतात तेव्हा ऐकणाऱ्यालाही खूप गम्मत वाटते.

परवांचाच प्रसंग घ्या. आम्ही सगळी माजघरांत जेवायला बसलो होतो. हो. सगळ्यांनी एकाच वेळी जेवायला बसायचं हा तात्यांच्या दंडक. रजेत आम्ही एकत्र जमलो की तात्या आम्हां सगळ्यांनाच जेवायला एकत्र बसवतात.आमच्या पंक्तीकडे पहात मग तात्या कसे म्हणतात, ‘अरे, या माजघरांत आम्ही पन्नास माणसं बसत होतो. एकाचवेळी आम्ही मधोमध एका लाकडी पायलीच्या मापटावर हा दिवा जळायचा. बरं का हे माजघर तेव्हां असं काय फुललेलं दिसायचं. आतां काय! तुम्ही रजा संपून मुंबईला गेलांत की आम्ही दोघंच राहतो या भल्या मोठ्या घरांत. मग घर हे असं काय खायला येतं म्हणून सांगू! तुम्ही रजेत आलांत, माजघरांत बसलांत की जुने दिवस आठवतात. बरं वाटतं मनाला मग...’

***

कथेचा ऑडीओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. (व्हॉइसओव्हर - अक्षय वाटवे)

[audio mp3="

***

तात्यांना माणसं खूप हवीत. एकटेपणा म्हणजे त्यांना मोठी शिक्षा वाटते.

ते जाऊं द्या...पण मी सांगत होतो काय...हा परवांचाच प्रसंग...

माजघरांत आम्ही सगळी जेवायला बसलो होतो. आम्ही अशी जेवायला बसलो की आमच्या समोर गोरी आलीच म्हणून समजा. गोरी म्हणजे आमच्या मांजरीचं नांव. तात्याना मांजराचा, कुत्र्याचा खूप शौक. गोरी हे नांव त्यांनीच ठेवलेले. मांजरीच्या शुभ्र रंगामुळं ते नांव त्यांना सुचलं असेल कदाचित्, गोरी अंगानं गुबगुबीत आहे. डोळ्यांनी चोरटी आहे. तिची तात्यांवर खूप माया आहे व तात्याही तिचे असे काही लाड करतात की विचारू नका.

तर काय झालं...आमच्या आईनं पाटपाणी ठेवलं. लाकडी पायलीच्या मापटावर मोठी चिमणी पेटत ठेवली. आम्हांला मग साद घालतांच आम्ही पाटावर बसलो. आमच्याबरोबर तात्या आले. आम्ही जेवायला बसलो की तात्यांच्या शतपावल्या चालू होत. मग मधेच ते गोरीला खेळवतील. गोरीही त्यांच्याशी रंगते खूप. आम्ही जेवायला सुरवात करणार तोच तात्यांनी गोरीला हातांनी कुरवाळले. पण गोरी आज मूडमध्ये दिसली नाही. तिनं तात्यांना ओरखडा काढला व वरच्या ‘पाट्या’कडे तिनं नजर रोवली. तात्यांनी पुनः तिला जवळ ओढलं. पण पुनः तेच. तिची नजर ‘पाट्या’ वर खिळलेली. तात्यांना तिच्या या वागण्याचं आश्र्चर्यच वाटले. आपला आवाज ऐकतांच कान टंवकारून आपल्यावर झेप घेणारी गोरी आज अशी कां करते तेंच त्यांना उमगेना. तात्यांनी कितीही लालचावलं तरी गोरीची नजर पाट्यावरून ढळेना. अखेर त्या तिच्या नजरेच्या रोखानं बघत तात्या मला म्हणाले, “तिथं काय दिसतं ते बघ रे... गोरी उगगाच अशी बघत रहायची नाही.”

खरंच होतं ते. तात्यांना गोरीनं असं कधीच ओरखडलं नव्हतं. मी बारीक नजरेनं ‘पाट्या’कडे बघू लागलो. तात्याही बघत होते. बघतां बघतांच मला पिंवळसर शेपटी ‘पाट्या’ वरून खाली भिंतीवर हालतांना दिसील. मी तात्यांना म्हटलं, “तात्या, जिवाणूं दिसतं.” मी लगेच माझ्या खोलीत जाऊन विजेरी आणली व त्या ‘पाट्या’ वर तिचा झोत टाकला तो काय? फणा वर करून एक साप तिथं डोलत असलेला आम्हाला दिसला. तात्या त्याच्याकडे गप्प राहून बघत राहिले. आम्ही सगळीच घाबरलो. मी म्हटलं, “तात्या काठी आणतो.”

त्यावर तात्या लगेच म्हणाले, “काठीबिठी कांही नको. ब्राह्मण आहे तो. त्याला मारूं नये.”

मी त्यांच्याकडे बघत राहिलो.

ते माझ्याकडे वळून म्हणाले, “त्याचा रंग बघितलास? पिंवळसर आहे... ‘ब्राह्मण’ असा असतो नेहमी. ”

त्यांचं हे बोलणं मला समजलंच नाही. सापाला जिवंत सोडला की तो कुणाचा तरी डंख धरून चावल्याशिवाय रहाणार नाही; अशी माझी ठाम खात्री. मी तात्यांकडे प्रश्र्नांकित नजरेने पाहिले. त्यांनी माझ्या नजरेंतला अर्थ ओळखला नि ते बोलले,

“तुम्हां अलीकडच्या पोरांना आमचे जुने विचार पटत नाहीत. पण हा साप आमच्या कुटुंबाच्या बऱ्यासाठी आहे. तो उगीच तसा बाहेर पडून दर्शन देणार नाही. कुठं तरी देवघरांत किंवा वास्तूकडे भ्रष्टाकार झाला आहे. म्हणूनच तो सांगायला आला. आतां एक त्याला तुपाचं निरांजन लावायला हवं...तुमचा नाही विश्र्वास बसणार यावर...तुझ्या जन्मानंतरची गोष्ट सांगतो तुला...”

तात्या गोष्ट सांगण्याच्या पवित्र्यांत बसले. जणूं त्या सापाची त्यांना यतकिंचित् भीति वाटली नाही. तो सापही थोड्या वेळानं सरसरत गेला. माझ्या मनाभंवती मात्र भीतीचं वेटोळं पडलं. तात्यांनी गोष्ट सांगायला सुरवात केली,

“...तू वर्षाचा होतास त्यावेळची गोष्ट. आमच्या या खळ्याबाहेरचा गडगा दगडांनी तेव्हा आम्ही बांधत होतो. गडगा बांधणीच्या कामाला चार पांच दिवस झाले. नि तुला ताप यायला लागला. गांवांतला झाडपाला देणार वैद्य आम्ही आणला. पण तापाचं निदान कळेना. की तापही हटेना. शेवटी शहरांतून मोठ्या डॉक्टरला आणलं. त्यालाही तापाचं मूळ बरोबर उमगेना. आमच्या मनांत काळजीनं घर ठोकलं. प्रत्येक दिवस संपत होता नि तुझी प्रकृती मोठी बिकट होत होती. हातापायांच्या नुसत्या काड्या झाल्या होत्या. डोळ्यांसमोर संकट भय घालीत होतं. काय करावं तेच समजेना. शेवटी देवाला प्रसाद लावायचं ठरवलं. आमचा देव म्हणजे गांवचा वेतोबा. संकट आलं की आम्ही धांव घ्यायची त्याच्याकडेच. आमच्या गांवचं ते जागतं दैवत. आमच्या नवसाची आंगवण व्हायची ती त्याच्यापुढंच. तोच आमचा त्राता ही श्रद्धाही खूप जुनी. जुन्या परंपरेतून वहात आलेली. दुसऱ्या दिवशी वेतोबाच्या देवळांत आम्ही जायचं ठरवलं व त्याच रात्री मला स्वप्न पडलं. या असल्या स्वप्नावर तुमचा आज विश्र्वास नाही बसायचा, पण देवाला किंवा दैवाला जर माणसाशी बोलायचं झालं तर ते स्वप्नांत येऊन बोलतं. लक्षांत ठेवा.”

तात्या मधेच थांबले. त्यांनी आपली बोटं पिकलेल्या मिशीवरून सासपली. ही त्यांची नेहमीची सवय व बोलतांना मधेच थांबून मिशीवरून बोटं फिरवायची. तात्यांनी मग गोष्टीचा धागा पुढं ओढला,

“त्या स्वप्नांत मला तो गडगा दिसला. गडग्याच्या एका बाजूला एक बीळ दगडांनी गच्च झाकलं होतं. त्या बीळाच्या तोंडावर असलेल्या एका दगडाखाली हा साप मला दिसला. दगड उलथून तो बाहेर पडायचा प्रयत्न करीत होता. किती दिवस तो तसा होता कोण जाणे! पण बराच रोडावला होता. आणखी कांही दिवस तो तसाच राहिला असता तर खास उपाशी मेला असता...

मी डोळे उघडले. माझं मन काहीसं घाबरल्यासारखं झालं होतं. त्या स्वप्नाचा अर्थ मी बरोबर हेरला.

सकाळ झाली. गडगाबांधणीच्या कामासाठी गडीमाणसं जमली तसा मी पुढं सरलो. स्वप्नांत मी गडग्याची जी बाजू बघितली होती, तिथं गेलो व दगड तपासूं लागलो. गडीमाणसांना हांक मारून मी ते दगड काढले. व काय आश्र्चर्य, तो साप तिथंच मृतवत होऊन पडला होता. बीळाच्या तोंडावरचा दगड काढतांच तो अर्धमेला साप हळूहळू सरपटत गेला. माझ्या जवळच्याच इसमानं त्याला ठेंचण्यासाठी दगड उगारला. पण मी त्याला बळेच आवरलं.

तो साप असा मरणांतून वांचला व लगेच तुला गुण पडायला सुरवात झाली...असा हा साप...साप नाही ब्राह्मण...आमच्या घराण्याचाच कुणीतरी वडीलधारा पुरुष कसा हा सापाच्या रूपानं इथं वावरतो आहे.

सापाची कात पांघरून वावरणारे कित्येक देवात्मे असतात. सापाच्या जातींत ते वावरत असले तरी त्यांना वीष नसतं. ते जगतात ते एखाद्याच्या भल्यासाठी. त्यांची मुकी नजर तुमच्या कल्याणाकडेच टक लावून असते. मग कुठचं तरी संकट येत असलं तर ते तुमच्या स्वप्नांत येऊन सांगतील. नाहीतर तुमच्या डोळ्यांसमोर येऊन उभे राहतील. पण आमची जात नतद्रष्ट. सापासारख्या दिसणाऱ्या त्या निरुपद्रवी प्राण्याला सापाच्याच विषारी मोलानं आम्ही मोजतो. त्यांचे मुक्या नजरेचे बोल कळण्याइतकी आम्हाला बुद्धीच कुठं असते! म्हणून म्हणतो, त्याला मी कधीही मारूं देणार नाही. त्याला मारला की आमच्यांतला कुणीतरी दगावलाच म्हणून समजा!”

तात्यांचं बोलणं संपलं. गोष्टीच्या नादांत आमचं जेवण मात्र राहिलं...

तुम्ही कांही म्हणा पण बुद्धिवादी मनाला हे पटत नाही. फसव्या श्रद्धेवर जोपासल्या गेलेल्या दुबळ्या मनाचे हे आभास मला संमत नाहीत. म्हणूनच तात्यांचं हे बोलणं मला बिलकूल पटले नाही...

एक गोष्ट मात्र खरी की तो साप मात्र मग एकदोन दिवस दिसत होता. एकदां तर तो मला परसांतल्या विहिरीकडे दिसला. दुसऱ्यांदा मला तो अंगणांत दिसला. मी मनाशी ताडलं की याला जर असाच सोडला तर हा कुणाला तरी चावल्याशिवाय राहणार नाही. पुनः दिसला की याला ठेंचून काढायचा.

आणि दुसऱ्याच दिवशी मला तो पुनः दिसला ‘वेळे’ वरून फिरून यायला मला कांहीसा उशीर झाला होता. संध्याकाळच्या मंद प्रकाशांत मी जपून पावलं टाकीत होतो. कोंकणांतल्या काळोखांत भुतापेक्षां जिवाणूचं भय मला फार वाटतं म्हणून फिरायला जातांना माझ्यासोबत नेहमीच विजेरी असते. तेव्हा आमच्या घरापुढच्या खळ्यांत मी पाय टाकला मात्र अन् काहीसं विळविळल्यासारखं झालं. मी चटकन् माझ्या पायालगत विजेरीचा झोत टाकला. बघतो तो काय, तात्यांचा ‘ब्राह्मण’ माझ्या पायाशी हजर. त्याला बघितल्याबरोबर मी घाबरून गेलो. कसंलच भान मला राहिलं नाही. मागचा पुढचा विचार न करतां जवळच्याच दगडांचा मी त्याच्यावर मारा सुरू केला. व त्या सापाला पुरा चेंचून काढला.

घरी मात्र मी हे कुणालाच बोललो नाही. उगाच तात्यांच्या कानावर जायचं ही नसती भीती.

दोन दिवस असेच गेले. अन् तिसऱ्या दिवशी तात्यांना ताप भरला. तात्यांची प्रकृति निकोप. सत्तरीला टेकले तरी डोंगराची चढण ते मोठ्या उमेदीनं चढत. त्यांना कधी कसलाच रोग झाला नव्हता. तेव्हा तात्यांच्या आजारीपणानं सगळ्या घरांतच काळजी निर्माण झाली. त्या आजाराचं निदान कांही कुणाला कळेना.

मी शहरांतून मोठ्या डॉक्टरना आणलं. औषधपाणी सुरू झालं. पण गुण पडेना.

आमचं धाबं दणाणलं. माझ्या मनात मात्र मधून मधून तो दगडांनी ठेंचलेला ‘ब्राह्मण’ गस्त घालू लागला. तात्यांचे शब्द रात्रंदिवस मला भेडसावूं लागले. मी बेचैन झालो. मुका मार बसलेला माणूस जसा आंतल्या आंत तळमळतो तसा मी तळमळू लागलो.

त्या दिवशी संध्याकाळी तात्या मला म्हणाले, “आतां यांतून मी जगत नाही. कसलं दुखणं झालंय कोण जाणे. पण व्हायचंच ते. मी बोललो नव्हतो का तसं? उगीच नाही धरलं मी अंथरूण! त्या ब्राह्मणाला कुणी तरी ठेंचला.”

“कशावरून म्हणतां हें?” मी दबकतच विचारलं.

“काल मला तो स्वप्नांत दिसला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता व त्या तशा रक्ताळलेल्या, फुटलेल्या डोक्यानं ते तडफडत होता... म्हणूनच मी म्हणतो, तो आतां मला घेऊन जाणार हे खास. मी गेलो तरी हरकत नाही. पण माझ्यानंतर मात्र त्याची दृष्टी कुणावर न जावो. या जातीचं सांगता येत नाही. वंशच्या वंश तो मारून टाकतो.”

...दुसऱ्या दिवशी सकाळीच तात्यांचं प्राणोत्क्रमण झालं. मी खूप रडलो. मला वाटलं...मीच त्यांना मारलं...ते आणखीन जगले असते...

त्यांचंच खरं होतं.

आम्हांला वाटतं, श्रद्धा आंधळी असते. पण तशी ती नसते. तिला खूप दूरवरचं दिसतं. मुक्या वाणीचं मनसुद्धां तिला समजतं. तिला ऐकूं येतं. बोललेलं अन् न बोललेलं.

**********

लेखक – आनंद रेगे

अधिकचे दुवे - पुनश्चच्या संग्रहातील या अन्य काही कथाही अवश्य वाचा.
  1. अन्नदान (ऑडीओसह)  - लेखक : मनोहर शहाणे - अंक- सत्यकथा, १९७९
  2. गोंडांच्या लिंगो देवाची विलक्षण कहाणी - लेखिका : दुर्गा भागवत - गावकरी दिवाळी अंक -१९५१
  3. ‘माय सन, डू यू वॉन्ट धिस बलून?’ ( ऑडीओसह ) - लेखक : विलास पाटील - अंक अंतर्नाद
Google Key Words - मराठी कथा, Katha, Marathi Katha, Anand Rege.

कथा , आलमगीर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.