अंतर्नाद दिवाळी २०२०
अंतर्नाद कशासाठी...
आजकाल कुठेही नजर फिरवा आर्थिक समृद्धीबरोबरच सांस्कृतिक कंगालपणाच्या खुणाही पटकन नजरेत भरतात.
सातासमुद्रापार कुठेही क्षणार्धात संपर्क साधायची सोय असलेला हातातला अत्याधुनिक मोबाइल आणि फ्लॅटच्या बंद दाराआड एकेकट्याने वाढणारी आपली संवादविन्मुख पुढची पिढी. उपलब्ध करून देणे. 'ग्लोबल व्हिलेज'ची अविरत चर्चा आणि एकमेकांच्या बिड चुकूनही कधी पाय न ठेवणाऱ्यांच्या 'कोऑपरेटिव्ह सोसायट्या. नवनव्या उत्पादनांनी ओसंडणारी बाजारपेठ व टीव्हीवरचा रंगीबेरंगी जल्लोष आणि भावनांचे बधिरीकरण व जीवनाचे थिल्लरीकरण.
आर्थिक समृद्धी इतकीच सांस्कृतिक समृद्धीचीही समाजाला गरज असते. ही सांस्कृतिक समृद्धी साहित्याच्या माध्यमातून वाढवण्याचा अंतर्नाद हा एक छोटा प्रयत्न आहे.
दलाल स्ट्रीटवरचे चढउतार आणि शॉपिंग मॉलवरची दिलखेचक प्रलोभने ह्यांच्यापलीकडच्या एका आगळ्या अधिक शाश्वत विश्वात श्रेष्ठ साहित्य आपल्याला घेऊन जाऊ शकते. टीव्हीवर काल काय बघितले, ते कदाचित आज आठवणार नाही, पण वीस-तीस वर्षांपूर्वी वाचलेले मात्र आजही आठवते. मनावर कोरले जाण्याची, संस्कार करण्याची लिखित शब्दांची क्षमता अजूनही उल्लेखनीय आहे.
आज जीवनाचा विविधांगांनी अफाट विस्तार होत आहे आणि साहजिकच साहित्याला समाजव्यवहारात पूर्वीइतके सर्वव्यापी महत्त्वाचे स्थान राहिलेले नाही, हे उघड आहे. परंतु चांगल्या साहित्याची अनेक सामर्थ्यस्थळे आजही लक्षणीय आहेत.
चांगले साहित्य वाचकाला अंतर्मुख करते. त्याचबरोबर त्याची जिज्ञासा व संवादाची भूकही जागवते. जीवनाचे अल्पपरिचित पैलू नजरेसमोर जाणिवेच्या कक्षा रुंदावते, आणून त्याचप्रमाणे त्या सखोल करते; त्याला अस्वस्थ करते, उल्हसितही करते. अशा परस्परविरोधी परिणामांतून ते वाचकाच्या भावविश्वाला व्यामिश्रता आणि अनुभवविश्वाला अर्थपूर्णता देत असते. साहित्य कदाचित स्वतःच्या बळावर समाजात परिवर्तन घडवू शकणार नाही, पण ते तशा परिवर्तनाच्या अपेक्षा नक्की निर्माण करू शकते; विकाससन्मुखता जोपासू शकते; एका अधिक चांगल्या समाजाचे स्वप्नतरी जिवंत ठेवू शकते. आपापल्या जगण्यातून प्रत्येक जण शिकतच असतो; साहित्य इतरही अनेकांच्या जगण्याचे सार आपल्यापर्यंत पोहोचवते. मनावर व समाजावर या सगळ्यातून कळत-नकळत संस्कार होत असतात, त्यातूनच सांस्कृतिक समृद्धीही साधली जात असते.
ही सांस्कृतिक समृद्धी वाढवणे हे अंतर्नादचे ध्येय आहे. या मूलभूत व्यापक ध्येयाप्रत वाटचाल करण्याच्या दृष्टीने तीन सुस्पष्ट उद्देश 'अंतर्नाद ने पहिल्या अंकापासूनच समोर ठेवले आहेत :
१. मराठी भाषेच्या व साहित्याच्या संवर्धनाला हातभार लावणे.
२. सकस साहित्याच्या वाचनाची आवड जोपासणे.
३. अन्य माध्यमांतून आज सहसा स्थान न मिळणाऱ्या पण मौलिक अशा वैचारिक व ललित लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
हे तिन्ही उद्देश साधतील अशा प्रकारच्या साहित्यासाठी मासिक हे माध्यम आजही खूप सोयीचे आहे. मासिकातील साहित्य बातम्यांच्या आणि जाहिरातीच्या भाऊगर्दीत हरवून जात नाही. दैनिक वा साप्ताहिकाप्रमाणे घडलेल्या सर्वच घटनांवर घाईघाईने भाष्य करायची मासिकाला गरज नसते. मासिकातील लेखन तात्कालिक महत्त्वापेक्षा, बातमीमूल्यापेक्षा अधिक व्यापक संदर्भावर बेतलेले, चटपटीत शैलीपेक्षा अनुभवाच्या खोलीवर व व्यासंगावर भर शकते. ह्या लेखनासाठी, त्यावर संस्कार करून आवश्यक अशा असू श पुनर्लेखनासाठी पुरेसा वेळ देता येतो. कल्पनेच्या वा विचाराच्या समग्र अभिव्यक्तीसाठी आवश्यक एवढी जागाही मासिकाला देता येते. लेखनादरम्यान चर्चा चिंतनाला वाव असतो. या सगळ्यामुळे साहित्य जास्त परिपक्व बनू शकते. वाचकाच्या वेळेवरही मासिक आक्रमण करत नाही. लेखनाचा योग्य तो आस्वाद घ्यायला, त्यावर विचार करायला आवश्यक तो निवांतपणा मासिकच वाचकाला देऊ शकते.
इंग्रजीचा वा हिंदीचा दुस्वास न करताही मराठी भाषा व साहित्य समृद्ध करता येते, अशी अंतर्नादची धारणा आहे. कुठल्याही प्रकारची सामाजिक, राजकीय, वैचारिक वा साहित्यिक अस्पृश्यता अंतर्नाद पाळत नाही. अन्य कुठल्या नव्या-जुन्या मासिकाशी अंतर्नाद स्वतःची बरोबरी करू इच्छित नाही, स्वतःविषयी अवास्तव दावेही करू इच्छित नाही.
अंतर्नादमध्ये सुधारणांना भरपूर वाव आहे, याची आम्हांला जाणीव आहे. प्रत्येक मासिक हे शेवटी आपापल्या काळानुसार, परिस्थितीच्या मर्यादांनुसार वाचकवर्गानुसार स्वतः संपादकाच्या विशिष्ट अशा पिंडानुसार आणि सर्वांत निर्णायक म्हणजे मासिकात लिहिणारे लेखक शेवटी किती कसदार लिहितात त्यानुसार आकार घेत असते. मराठी साहित्यविश्रापुढच्या आजच्या अनेक गंभीर अडचणी तशा बहुपरिचित आहेत. पण त्या अडचणींवर यथाशक्ति मात करत इतकी वर्षे न चुकता दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अंतर्नादचा अंक प्रकाशित होत आहे.
आपल्याला हा अंक आवडला तर आपणही अवश्य वर्गणीदार व्हावे, शक्य असेल तर जाहिरातींच्या मार्फतही सहकार्य करावे, अंतर्नादची आजवरची वाटचाल ही साहित्यप्रेमींच्या अशाच सहकार्यामुळे शक्य झाली आहे.
(अंकात वेळोवेळी छापलेले निवेदन)
बहुविध चे सभासदत्व* घ्या.