आहार, निद्रा, भय ...

 प्रस्तावना

 

आहार, निद्रा, भय हे यश वेलणकर यांचे पुस्तक वाचताना सुरुवातीस माझी खूप अपेक्षा नव्हती. हे पुस्तक बहुतेक छोट्या वृत्तपत्रीय लेखांचे संकलन असावे असे वाटले. बरेच आयुर्वेदिक लेखक वृत्तपत्रीय लेखन करतात त्यात ग्रंथोक्त पुरावे देण्यापलीकडे फारसे काही नसते. डॉ. यश वेलणकरांचे हे पुस्तक मात्र वेगळे आणि उद्बोधक आहे. मी स्वतः एका बैठकीत ते वाचून संपवले इतके ते वाचनीय झाले आहे. या पुस्तकाचा मुख्य गुण म्हणजे आधुनिक आणि आयुर्वेदीय अशा शास्त्रीय संकल्पनांचा छान मेळ. हे फार कमी लोकांना जमते, बऱ्याच वेळी दोन्ही वैद्यकांचे लोक एकमेकांवर टीका करून मोकळे होतात. मात्र वेलणकरांनी अगदी अँटी ऑक्सिडंट सारख्या आधुनिक संकल्पनांचाही सुंदर ऊहापोह केला आहे.

या पुस्तकातल्या प्रकरणांची शीर्षकेही अगदी बोलकी आहेत. सकाळी राजा रात्री भिकारी, शरीरातील साठेबाजी, खिचडी खाऊन उपास, रात्र संपता संपेना वगैरे आकर्षक शीर्षकांनी अनेक प्रकरणे वाचावीशीच वाटतात. केवळ शीर्षकेच नाही तर आतला मजकूरही खुसखुशीत शैलीत मांडला आहे. हे सगळे करताना शास्त्रीयता कोठेही कमी नाही. मराठीत हल्ली चांगले शास्त्रीय लेखन होऊ शकते याचा हा पुरावा आहे. सोपी शब्दयोजना हा तर लेखांचा विशेष आहे. यात आहाराच्या विवेचनासाठी जास्त प्रकरणे दिली आहेत. त्यातल्या काही प्रकरणांचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. सकाळी राजा रात्री भिकारी या प्रकरणात आपला जेवणांचा दिनक्रम कसा चुकीचा आहे हे छान सांगितले आहे. यासाठी आयुर्वेदिक तसेच आधुनिक संकल्पना (उदा. जैवघड्याळ) या दोन्ही बाजूंनी मुद्दा मांडला आहे. मांसाहार विरुद्ध शाकाहार ही चकमक नेहमीच होत असते. याच्या दोन्ही बाजू वेलणकरांनी काही तटस्थतेने व थोड्या अनिर्णित पद्धतीने दिलेल्या दिसतात. शास्त्रीय विवेचन करताना हे परिहार्य आहे. मला या निमित्ताने हे सांगावेसे वाटते की भारतीय उपखंडात इतर सर्व देश मांसाहारी आहेत, भारत त्यामानाने फारच शाकाहारी आहे. रक्तपांढरी (हिमोग्लोबीन कमी असणे.) या आजाराचे प्रमाणही देशात ७०-८०% च्या आसपास आहे. ३०%  पुरुषही कमी रक्तद्रव्य असलेले आढळतात. इथे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मांसाहाराची उणीव अशी जाणवते. याउलट अमेरिका वगैरे देशात मांसाहाराचे प्रमाण कमी केल्यावर हृदयरोगांचे प्रमाणही कमी झाले असेही उदाहरण आहे. यातील तपशील आणि समतोल विचार महत्त्वाचा आहे. आयुर्वेदिक तज्ञ म्हटला की मांसाहार निषेध गृहीतच धरला जातो. वेलणकर असा सरधोपट मार्ग सोडतात हे चांगले आहे. मद्यपान-निषेधाचा हा असाच समतोल विचार वेलणकरांनी केला आहे. अल्प प्रमाणात मद्यार्क आरोग्याला उपकारक आहे, अशी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाली भूमिका आहे. व्यसनाधीनतेचे समर्थन कोणीही करणार नाही. या संदर्भात 'वाइनचा आहारात समावेश', असा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. भारतात सिंड्रोम (स्थूलता रक्तातील साखर वाढणे, रक्तदाब वाढणे) च्या प्रभावामुळे मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार वगैरे विकार वाढत आहेत. योग्य आहारविहारातूनच या आजारांचे निराकरण होऊ शकते. याची आवश्यक ती सर्व माहिती वेलणकरांनी या पुस्तकात विस्ताराने आणि रोचकपणे दिली आहे. ती आत्मसात करून आहारविहार बदलने शक्य आहे असे मला वाटते. लेखकानेही आपण बदलू शकतो हा मुद्दा वारंवार मांडला आहे. यातला आशावाद जाणवण्याइतका जोरदार आहे.

निद्रा आणि भय या दोन मुद्यांबद्दलची प्रकरणे खूप छान आहेत. यातील नवे शोध, आणि मानसशास्त्र वेलणकरांनी सुंदरपणे सहज मांडले आहे. या विषयांची अजिबात ओळख नसलेल्या वाचकांनीही विषयप्रवेश करायला ही प्रकरणे वाचावीत.

भारतीय योगशास्त्र, त्यातले प्राणायामाचे महत्त्व आता जगात सर्वत्र पटायला लागले आहे. योगशास्त्रातला शारीरिक, मानसिक भाग हाच जास्त प्रचलित आहे. केवळ याद्वारेही आरोग्य राखता येते हा अनेकांचा अनुभव आहे. वेलणकरांनी यातला श्वासाचा भाग चांगलाच मांडला आहे. यातील नाडी विचार (चंद्र नाडी, सूर्य नाही) महत्त्वाचा आहे,आणि लेखक म्हणतात तसे त्यावर जास्त निर्णायक अभ्यास करणे आवश्यक आहे. आपला नेहमीचा व्यायाम एरोबिक किंवा दमसासांचा (हवाहवासा) असतो, तो मुख्यतः सिंपथेटिक चेतासंस्थेच्या प्रभावाचा असतो. योगशास्त्रातील व्यायाम मुख्यतः आंतर-इंद्रियांच्या 'ऑटॉनमिक' चेतासंस्थेशी संबंधित/ उद्देशून असतो. त्यामुळे योगशास्त्र हे एक वेगळेच शास्त्र आहे. श्वास-प्रश्वास-कुंभक या सहजसाध्य मार्गानी मनावर नियंत्रण आणता येते हे एक अद्भुत सत्य आहे. जाता जाता हे सांगितले पाहिजे की आहार, निद्रा, भय-नियंत्रण(वर्जन नसले तरी) या योगशास्त्रातल्या अगदी प्राथमिक क्रियांनीही मी माझा अतिरक्तदाब विनाऔषध सहा महिन्यातच पूर्ण बरा करू शकलो. वेलणकरांचे लेख मला यासाठी पुनःप्रत्ययकारी वाटतात. हे लेखन केवळ तात्त्विक किंवा लेक्चरबाजी नसून उपयोगी आहे, व्यवहार्य आहे असे मला म्हणायचे आहे.

वृत्तपत्रीय लेखनात एक घाई आणि त्रोटकता असते, याच्या मर्यादा लेखांमध्ये जाणवतातच. वेलणकरांनी आता याच विषयावर अधिक विस्ताराने लिहावे असे माझे मत आहे. ते व वैद्य साने पब्लिकेशन चांगले काम करीत आहेत. या कामाला माझ्या शुभेच्छा,

 

डॉ. श्याम अष्टेकर M.D. (P.S.M.)

संचालक, आरोग्यविज्ञान विद्याशाखा

(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)

२१, चेरीहिल सोसायटी

पाइपलाइन, आनंदवल्ली

गंगापूर रोड, नासिक-४२२०१३

फोन ०२५३-२३४२४४७

मोबाईल- ९४२२२७१५४४

 

*** लवकरच या डिजिटल पुस्तकातील एकेक प्रकरण आपल्या भेटीला येत आहे.

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

आहार, निद्रा, भय ...

हवामानानुसार आहार

डॉ. यश वेलणकर | 18 Jun 2021

उन्हाळ्यात मांसमासे, तळलेले पदार्थ, खाऊ नयेत. ते लवकर पचत नाहीत, पचले तरी अंगाची आग आग करतात. आपल्या संस्कृतीमध्ये भर उन्हाळ्यात एकही मोठा सण नाही तो यामुळेच.

माणूस मांसाहारी की शाकाहारी?

डॉ. यश वेलणकर | 01 Jun 2021

शाकाहारापेक्षा मांसाहारात पोषणमूल्ये जास्त आहेत पण एखाद्याने सकस पौष्टिक शाकाहार घेतला तर आयुष्यभर मांस, मासे, अंडी खाल्ली नाहीत तरीही तो निरोगी व दीर्घायुषी होऊ शकतो.
Install on your iPad : tap and then add to homescreen